देवी पहाटे करणार अग्नी अंगावर घेऊन नृत्य. मुळगावच्या बहिणीचा घेणार निरोप. जत्रोत्सवाला सकाळीपासूनच प्रारंभ.

डिचोली/प्रतिनिधी
तीन वर्षांच्या खंडानंतर यावषी मयेतील पारंपरिक व अनन्यसाधारण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेली माल्यांची जत्रा आज (शनि. दि. 9 एप्रिल) साजरी होणार आहे. मयेतील देवी केळबाई मुळगावातील देवी केळबाईचा रात्री निरोप घेऊन तिची मुळगावात पाठवणी करणार आणि नंतर आपल्या पणाप्रमाणे अंगावर पेटते माले घेऊन चौखांबावर नृत्य करून आपला पण पूर्ण करणार. या जत्रोत्सवासाठी मये गावात उत्साहाचे वातावरण आहे.
आज शनिवारी सकाळी गावकरवाडा येथून देव रवळनाथ व भूतनाथची तरंगे केळबाईवाडा येथील देवी केळबाईच्या मंदिरात वाजत गाजत नेण्यात येणार. सकाळीपासूनच धोंडगणांची मयेत गर्दी होणार. पवित्र तळीवर स्नान करून धोंडगण जत्रोत्सवासाठी सज्ज होणार.
रात्री आठ वा. च्या सुमारास तरंग देवता व केळबाई देवीच्या मंदिरात असलेले माले वाजत गाजत गावकरवाडा येथील चव्हाटा येथे आणले जाणार. मध्यरात्रीच्या सुमारास मुळगावातील पेठेचे मोड, चौगुले मानकरी व मुळगावातील असंख्य धोंडगण आपल्या देवीला मुळगावात नेण्यासाठी मयेत पारंपरिक वाटेतून दाखल होणार. त्यांचे मयेत स्वागत करण्यात आल्यानंतर चव्हाटय़ावर मुळगावच्या देवी केळबाईची पेठ सजविण्यात येणार. ती मोडाच्या डोक्मयावर स्वार केल्यानंतर गाराणे घातल्यानंतर पेठ मुळगावला जाण्यासाठी प्रयाण करणार. मयेतून निघताना दोन्ही देवी जड अंतःकरणाने एकमेकांचा निरोप घेणार.
त्यानंतर मयेतील देवी केळबाईची पेठ बांधण्यात येणार. पेठ व देवाची तरंगे एकत्रित चव्हाटा येथून बाहेर पडणार. रस्त्यावर पेठ व तरंगे एका ठिकाणी राहणार, तेथे गावच्या पेरणीकडून पेर्ण म्हटले जाणार. त्यानंतर पेठ व तरंगे महामाया मंदिराच्या परिसरातील खुल्या जागेत जाऊन थांबणार. त्यानंतर माले पेटविले जाणार. माले मोडाच्या डोक्मयावर स्वार केल्यानंतर गाराणे घातल्यावर मोडावर दैवी संचार येणार आणि तो अग्नीने रणरणते माले डोक्मयावर घेऊन चौखांबावर नृत्य करणार व आपला पण देवी केळबाई पूर्ण करणार.









