प्रतिनिधी /म्हापसा
मयडे पंचायतीच्या सरपंच रिया बेळेकर व उपसरपंच ओझवल्ड कोर्देरो यांच्यावर 4 पंचायत सदस्यांनी अविश्वासाची नोटीस शुक्रवारी गट विकास अधिकाऱयांकडे बजावली आहे.
ही नोटीस बजावताना सदस्यांना विश्वासात न घेणे, कामे न सांगता करणे, विकास कामाबाबत काहीच सुधारणा नाही अशी कारणे पुढे करण्यात आली आहे. या अविश्वास ठरावावर महेश साटेलकर, सुर्याकांत भाटलेकर, लवू ठाकूर व पूजा च्यारी यांच्या सह्या आहे.
हळदोणा मतदारसंघात सत्ता बदल होताच त्वरित चार पंच सदस्यांनी अविश्वासाची नोटीस बजावली आहे. पंच महेश साटेलकर यांनी याकामी पुढाकार घेतला असून महेश साटेलकरांनी आप पक्षावर हळदोण्यात निवडणूक लढविली होती. पुढे जाऊन ही पंचायत आपची होते काय याकडे सर्व मयडे वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. सरपंच रिया बेळेकर यांनी या निवडणुकीत माजी आमदार ग्लेन टिकलोना काम केले होते व सर्वाधिक मते त्यांनी भाजपला देण्यास पुढाकार घेतला होता तर उपसरपंच ऑझवल्ड कोर्देरो यांनी आपला पाठिंबा तृणमूलचे किरण कांदोळकर यांना दिला होता. व निवडणुकीनंतर घुमजाव करीत ते आमदार कार्लुस आल्वारीस बरोबर फिरत आहे. हे लक्षात घेऊन या चार पंच सदस्यांनी या दोघांवर अविश्वास ठराव आणला आहे.









