नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या बुधवारी आपण पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहोत, अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. केंद्र सरकारने नुकताच सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकार आणि कार्यकक्षा वाढविण्यासंबंधी अध्यादेश संमत केला आहे. तो मागे घ्यावा अशी मागणी आपण करणार आहोत. तसेच केंद्र सरकारने पश्चिम बंगालची थकबाकी चुकती करावी अशीही मागणी करणार आहोत असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तृणमूल काँगेसच्या काही खासदारांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेऊन त्रिपुरातील हिंसाचारासंबंधी तक्रार केली आहे. शहा यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असा दावा या खासदारांनी केला.









