वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला नेमबाज मनू भाकर ही सध्या क्रोएशियाची राजधानी झाग्रेब येथे युरोपियन नेमबाजी स्पर्धेसाठी दाखल झाली आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे तिकीट मनू भाकरने यापूर्वीच मिळविले आहे. मनू भाकरने नेमबाजीप्रमाणेच आपल्या अभ्यासावरही लक्ष केंद्रीत केले असून ती बीएची परीक्षाही देणार आहे.
क्रोएशियातील या स्पर्धेसाठी भारतीय नेमबाज पथकाकरिता पहिले सराव सत्र सुरू होण्याला एक दिवस बाकी असताना मनू भाकरने बीए अभ्यासक्रमातील चौथ्या सेमिस्टरची परीक्षा देणार आहे. मनू भाकरची परीक्षा 18 मे पासून सुरू होणार असून तिने अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजची मनू भाकर विद्यार्थिनी आहे. युरोपियन नेमबाजी स्पर्धेला 20 मे पासून प्रारंभ होत आहे. आता मनू भाकरने नेमबाजी स्पर्धा आणि आपल्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत केले आहे. मनूने हॉटेलमधील आपल्या खोलीत अभ्यास सुरू केला आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार असून या स्पर्धेत 19 वर्षीय महिला नेमबाज मनू भाकर नेमबाजीच्या तीन प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.









