निवडणूक प्रक्रिया लवकरच होणार जाहीर : राखीवतेमुळे बहुतांशजणांची धावपळ सुरु
प्रतिनिधी / पणजी
पणजी महानगरपालिका आणि इतर 11 नगरपालिकांच्या प्रलंबित असलेल्या निवडणुका शनिवार दि. 20 मार्च रोजी होणार असल्याचे संकेत मिळाले असून राज्य निवडणूक आयोगातर्फे या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
वॉर्डाची राखीवता आणि पुनर्रचना या प्रकरणावरून काही नगरसेवकांनी, इच्छुक उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली असून त्याला शह देण्यासाठी लवकरात लवकर निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. न्यायालयातील याचिकांमुळे निवडणुकीला बाधा येऊ नये म्हणून निवडणूक लवकर जाहीर करण्याचा उपाय संबंधितानी शोधून काढला असून त्यासाठीच 20 मार्च तारीख निश्चित करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
लवकरच जाहीर होणार सविस्तर कार्यक्रम
पालिका निवडणुकांची आचारसंहिता 26 फेब्रुवारीपासून लागू होण्याची शक्यता असून 20 मार्च रोजी मतदान तर सोमवारी 22 मार्च रोजी मतमोजणी असा कार्यक्रम निश्चित झाल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसातच निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम आयोग जाहीर करेल, असा अंदाज आहे.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्री आमदारांनी त्यांच्या क्षेत्रातील महत्वाची विकासकामे पूर्णत्वास न्यावीत, असे त्यांना सत्ताधारी पक्षातर्फे सुचित करण्यात आले आहे.
राखीवतेमुळे बहुतांशजणांची धावपळ सुरु
पालिका निवडणुका पक्षीय पातळीवर होणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. नगरसेवक, इच्छुक उमेदवार पुन्हा एकदा गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी तयारी करीत आहेत. ज्यांचे वॉर्ड राखीव झालेत तेथे पत्नीला निवडणुकीत उतरवायचे किंवा शेजारी वॉर्डातून उभे रहायचे असे पर्याय ते शोधत आहेत.
वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण या प्रकरणातून न्यायालयासमोर आलेल्या याचिका निवडणूक तारीख निश्चित झाल्यास फेटाळल्या जातील, असा सल्ला आयोगास देण्यात आल्याचे वृत्त आहे. एकदा तारीख जाहीर झाली की याचिकांचा काहीच उपयोग होणार नाही, असा काही वकिलांचा दावा असल्याचे समोर आले आहे.
पालिका वॉर्ड आरक्षण कायद्यानुसारच : मुख्यमंत्री
पालिका निवडणुकीसाठी वॉर्डाचे आरक्षण, पुनर्रचना हे सर्व नियमानुसारच झाल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. ते कोणत्याही राजकीय पक्षाला फायदेशीर होईल म्हणून केलेले नाही, तर कायद्यानुसारच झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागील निवडणुकी जे आरक्षित वॉर्ड होते ते आता खुले झाले तर खुले होते ते आरक्षित झाले हे दर निवडणुकीचे चित्र असते, असे त्यांनी नमूद केले.
प्रत्येक पंचायतील देणार 50 लाख रुपये गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्षनिमित्त मिळणाऱया रु. 300 कोटीतून प्रत्येक पंचायतीस स्वयंपूर्ण करण्यासाठी रु. 50 लाख देण्यात येतील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्यासाठी पंचायतींनी विकासकामांचे प्रस्ताव लकरात लवकर सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन त्यांनी केले.









