लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याची टीका : पुन्हा फलक बसविण्याकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात नामफलक उभारण्यासाठी महापालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्ची घातला होता. मात्र स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविताना नामफलक काढून ठेवण्यात आले असून ते पुन्हा बसविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ठिकठिकाणी असलेले नामफलक सध्या धूळ खात पडले आहेत. नामफलक बसविण्याकडे मनपा प्रशासन लक्ष देईल का, अशी विचारणा होत आहे.
विविध रस्त्याशेजारी तसेच चौकामध्ये व उद्यानांमध्ये तिन्ही भाषेतील नामफलकांची उभारणी महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. नामफलक उभारण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. पण या नामफलकांची सध्या दुर्दशा झाली असून काही ठिकाणी नामफलक कचराकुंडीत टाकण्यात आले आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यात आला. तसेच फुटपाथ व गटारीचे बांधकाम करण्यासाठी ठिकठिकाणी असलेले नामफलक हटविण्यात आले आहेत. पण सदर फलक बसविण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीने कानाडोळा केला आहे.
महानगरपालिकेने बसविलेले नामफलक पुन्हा बसविण्याकडे दुर्लक्ष करून स्मार्ट सिटीने काही ठिकाणी नवीन फलक उभारले आहेत. पण हे फलक खूपच लहान असून फलकावरील मजकूर केवळ कानडी आणि इंग्रजी अशा दोनच भाषेत आहे. सदर फलक वाहनधारकांना वाचता येत नाही. लहान असलेल्या फलकावरील मजकूर वाचण्यासाठी वाहनधारकांना थांबण्याची गरज आहे. पण महानगरपालिकेने बसविलेल्या फलकावरील मजकूर मोठय़ा अक्षरात असल्याने वाचताना कोणतीच अडचण भासत नाही. मात्र सदर फलक धूळ खात पडले आहेत. मनपाने लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले फलक कचराकुंडीत टाकण्यात आल्याने निधी वाया गेला असल्याची टीका नागरिक करीत आहेत. सदर फलक उभारणीसाठी मनपा प्रशासन लक्ष देईल का, अशी विचारणा होत आहे.









