प्रति महिना मिळणार 85 हजार रुपये महसूल
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी मनपाच्या मालकीचे 85 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. यापैकी केवळ 20 गाळय़ांनाच बोली लागली असून, प्रति महिना 85 हजार रुपये भाडे महापालिकेला मिळणार आहे. 85 पैकी 40 गाळे भाडेतत्त्वावर देण्यास न्यायालयाची स्थगिती असल्याने सव्वालाख रुपये भाडय़ाला महापालिकेला मुकावे लागणार आहे.
महापालिकेच्या गाळय़ांच्या भाडे कराराची मुदत संपुष्टात आल्याने सदर गाळे ताब्यात घेऊन नव्याने भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. कसाई गल्ली फिशमार्केट येथील 20 गाळे, खंजर गल्ली येथील 40 गाळे, फोर्ट रोड येथील 2 गाळे, फुले भाजी मार्केट येथील 4 गाळे, महांतेशनगर व माळमारुती येथील 5 गाळे, खासबाग येथील 4 गाळे तसेच कोनवाळ गल्ली, अनगोळ नाका अशा विविध परिसरातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली. 85 गाळय़ांच्या माध्यमातून महापालिकेला प्रति महिना 7 लाखाहून अधिक भाडे मिळण्याची अपेक्षा होती. पण यापैकी खंजर गल्ली येथील 40 गाळय़ांच्या लिलाव प्रक्रियेत न्यायालयीन कारवाईचा अडथळा निर्माण झाल्याने गाळे भाडेतत्त्वावर देण्याचे स्थगित करण्यात आले. त्यामुळे उर्वरित 45 गाळय़ांपैकी केवळ 20 गाळय़ांनाच बोली लागली आहे. सरदार्स हायस्कूल मैदानाशेजारील चार गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार होते. पण गाळय़ांचे काम अर्धवट असल्याने लिलाव प्रक्रिया बारगळली होती. चार गाळे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी 26 नागरिकांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यामुळे या गाळय़ांना अपेक्षेपेक्षा जास्त भाडे मिळण्याची शक्मयता होती. पण अर्धवट कामाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडाला आहे.
फिशमार्केट येथील 20 पैकी 13 गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. त्यामुळे मनपाला प्रति महिना 40 हजार रुपये भाडे मिळणार आहे. महात्मा फुले मार्केट येथील 2 गाळे, फोर्ट रोड येथील 1 गाळा, माळमारुती येथील 2 गाळे, खासबाग येथील 2 गाळय़ांसाठी भाडेकरू मिळाले आहेत. या माध्यमातून महापालिकेला प्रति महिना 85 हजार रुपये भाडे सुरू झाले आहे. उर्वरित गाळय़ांसाठी पुन्हा एकदा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.