रुग्णांसाठी ऑक्सिजन, वैद्यकीय सेवेसह देखभालीसाठी आरोग्य अधिकाऱयांचे पथक नियुक्त करणार
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात कोरोना विषाणूची लाट पसरल्याने क्लोजडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सध्या शहरात सामसूम वातावरण असून कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने विविध उपाययोजना राबविण्यासह शहरात कोरोना केअर सेंटर्स सुरू करण्याची तयारी चालविली आहे. देवराज अर्स हॉस्टेल, रामतीर्थनगर तसेच हनुमाननगर अशा विविध ठिकाणी दोनशे बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.
राज्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता शहरात आवश्यक उपाययोजना राबविण्यास जिल्हा प्रशासनाने हालचाली चालविल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी क्लोजडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शहरातील बहुतांश व्यवसाय बंद ठेवण्यात आले असून केवळ औषध दुकाने आणि रुग्णालये सुरू आहेत. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या भागात महापालिकेकडून मायक्रो कंटेन्मेंट करण्यात येत आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयातील बेड कमी पडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे महानगरपालिकेने शहरातील हॉस्टेलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारी कर्मचाऱयांसाठीकाही बेड राखीव ठेवण्यात येणार
देवराज अर्स येथील हॉस्टेल, हनुमाननगर येथील हॉस्टेल आणि रामतीर्थनगर, श्रीनगर येथील रुग्णालय अशा ठिकाणी बेडची व्यवस्था करून कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच ऑक्सिजन, वैद्यकीय सेवा आणि रुग्णांची देखभाल करण्यासाठी आरोग्य अधिकाऱयांचे पथक नियुक्त करण्यात येणार आहे. सरकारी कर्मचाऱयांसाठी काही बेड राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.