गाळे रिकामी करण्याची सूचना : गाळेधारकांच्या विरोधात कॅव्हेट
प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील महापालिकेच्या व्यापारी संकुलाची पाहणी करून दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गाळे रिकामी करण्याची सूचना गाळेधारकांना करण्यात आली आहे. पण गाळेधारक गाळे रिकामी करण्यास टाळाटाळ करीत असल्याने महापालिकेने गाळेधारकांच्या विरोधात कॅव्हेट दाखल केले आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापारी संकुलाची उभारणी करून गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील व्यापारी संकुलाची दुरवस्था झाली असून येथील छताला गळती लागली आहे. काही गाळय़ांचे छत कोसळत असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. सदर व्यापारी संकुलातील वायरिंग 35 वर्षांपूर्वीचे असल्याने वारंवार खराब होत आहे. गाळय़ाची दुरुस्ती करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. दुरुस्तीकरिता सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे संकुलातील गाळेधारकांनी भाडे भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. काही भाडेकरूंच्या कराराची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे पुन्हा भाडेतत्त्वावर देण्याकरिता गाळय़ांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता महापालिका आयुक्तांनी अधिकाऱयांसमवेत व्यापारी संकुलाची पाहणी करून माहिती घेतली. दुरुस्तीकरिता तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाची माहिती घेतली.
व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यापर्यंतचे गाळे पाडण्यात येणार असून नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. या ठिकाणी स्वच्छतागृह, विद्युत वायरिंग आणि व्यापारी संकुलाच्या आवारातील विद्युत दिवे नव्याने बसविण्याचा प्रस्ताव आहे. व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. याकरिता भाडेकरूंना गाळे रिकामी करण्याची सूचना करण्यात आली आहे. काही गाळेधारकांच्या कराराची मुदत संपुष्टात आली आहे. तरीदेखील गाळे रिकामी केले नाहीत. त्यामुळे सर्व गाळे रिकामी करण्याची सूचना गाळेधारकांना करून कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे ठाण मांडलेले गाळेधारक न्यायालयात धाव घेण्याची शक्मयता असल्याने महापालिका प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. गाळे रिकामी झाल्यानंतर पहिल्या मजल्यावरील गाळे पाडून नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतून उपलब्ध झाली आहे.









