तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी हा विभाग प्राधान्यक्रमाने राज्य परिवहन महामंडळाकडे प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यास द्यावा. नसेल तर खासगीकरण करावे, अशी चर्चा परिवहन समितीच्या बैठकीत झाल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.
महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन खात्याच्या समस्या व उपायासंदर्भात महापौर कक्षात सोमवारी बैठक झाली. आयुक्त डॉ. दीपक तावरे, उपमहापौर राजेश काळे, सभागृहनेते श्रीनिवास करली, परिवहन समिती सभापती गणेश जाधव, विरोधी पक्षनेते महेश कोठे, गटनेते आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, प्र. परिवहन व्यवस्थापक लिगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापालिकेच्या परिवहन विभागाला दररोज दीड ते दोन लाख रूपये भुर्दंड सहन करावा लागत आहे. कामगारांच्या वर्षभराचे पगार थकीत आहेत. हा विभाग डबघाईला आला आहे. त्यामुळे या विभागाला कायमस्वरूपी उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. आर्थिक मदतीशिवाय नियोजन होणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी परिवहन उपक्रमावर ठोस अशी उपाययोजना करण्यासाठी महापौरांना विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत आयुक्त डॉ. तावरे यांनी परिवहन उपक्रमाला एसटी महामंडळाकडे प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यासाठी का देऊ नये ? असा प्रस्ताव ठेवला. यावर पदाधिकारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आयुक्तांच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच उपस्थित सदस्यांनी परिवहन विभागाचे खासगीकरण करण्याच्या सूचना केल्या. यावर ठोस असा निर्णय येत्या सर्वसाधारण सभेत होण्याची शक्यता आहे.
परिवहनची स्थिती
-महापालिकेच्या परिवहन खात्यास सध्या 37 कोटीची तूट आहे. सध्या 34 बस रस्त्यावर धावत असून, 500 कामगार कार्यरत आहेत. त्यामुळे या खात्यास उर्जितावस्था प्राप्त होणार नाही. त्यामुळे परिवहन खाते राज्य मार्ग परिवहन मंडळाकडे वर्ग करावे किंवा या परिवहन खात्याचे खाजगीकरण करावे. खासगीकरणानंतर या खात्यातील कर्मचारी महानगरपालिकेकडे वसुलीसाठी व वर्कशॉपकडे घेण्यात यावे. तसेच पाच महिन्यांसाठी परिवहन व्यवस्थापकाचे पद भरण्यासाठी परिवहन विभागाने जाहीरात द्यावी, असे बैठकीमध्ये ठरले.









