जिल्हाधिकारी-मनपा आयुक्तांसह पाच उमेदवारांना म्हणणे मांडावे लागणार
प्रतिनिधी /बेळगाव
मनपा निवडणूक पारदर्शी झाली नसल्याच्या तक्रारी काही उमेदवारांकडून करण्यात आल्या होत्या. याबाबत न्यायालयात दाद मागतली असून, म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे. निवडणूक अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांसह वॉर्ड क्र. 41 मधील पाच उमेदवारांना 14 डिसेंबरच्या आत म्हणणे मांडावे लागणार आहे.
मनपा निवडणुकीवेळी मतदार यादीचा गोंधळ निर्माण झाला होता. वॉर्ड पुनर्रचना व्यवस्थित झाली नसल्याने कित्येक मतदार मतदानापासून वंचित राहिले. वॉर्ड क्र. 41 मध्ये 6 उमेदवार रिंगणात होते. मात्र या वॉर्डमध्ये केवळ 45 टक्के मतदान झाले. मतदारयादीत नावेच नसल्याने मतदान कमी झाले आहे. त्यामुळे माजी नगरसेवक ऍड. रतन मासेकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात निवडणूक प्रक्रियेविरोधात याचिका दाखल केली आहे.
प्रक्रिया पारदर्शी नसल्याची तक्रार
व्हीव्हीपॅट जोडली नसल्याने मतदान प्रक्रिया पारदर्शी झाली नसल्याची तक्रार न्यायालयाकडे केली. वॉर्ड पुनर्रचना अधिसूचनेनुसार मतदारयाद्या तयार केल्या नसल्याची तक्रार असून, 2 हजारहून अधिक मतदारांची नावे गहाळ झाल्याचा दावा केला आहे. अन्य वॉर्डातील 1800 मतदारांची नावे वॉर्ड क्र. 41 मध्ये दाखल केली होती. वॉर्ड क्र. 41 मधील 800 हून अधिक मतदारांची नावे अन्य वॉर्डमधील मतदारयादीत समाविष्ट केली आहेत. परिणामी मतदारयादीचा घोळ निर्माण झाल्याने मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
वॉर्ड पुनर्रचनेनुसार मतदारयादी तयार करणे आवश्यक होते. पण मनपा प्रशासनाने वॉर्ड पुनर्रचनेनुसार मतदारयादी तयार केली नव्हती. त्यामुळेच त्या वॉर्डमधील मतदारांची नावे मतदारयादीत उपलब्ध नसल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नाही. त्यामुळे सदर निवडणूक प्रक्रिया पारदर्शी झाली नसल्याची तक्रार न्यायालयात ऍड. रतन मासेकर यांनी केली आहे.
प्रतिवादींना बजावली नोटीस
या याचिकेत निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त व पाच उमेदवारांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली असून 14 डिसेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे. केएमसी 32 कलमानुसार सहा महिन्यांच्या आत याचिकेचा निकाल लावणे बंधनकारक आहे.