सोमवारपासून मनपा कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू
प्रतिनिधी /बेळगाव

महापालिका निवडणुकीची अधिसूचना सोमवारी जारी झाली असून महापालिका व्याप्तीमध्ये आचारसंहिता लागू झाल्याने नव्या कामांची सुरूवात करण्यास ब्रेक लागला आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी महापालिकेत धाव घेतली आहे. तसेच प्रत्येक चार वॉर्डांकरिता एक याप्रमाणे निवडणूक अधिकारी व साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती करून निवडणूक प्रक्रियेला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.
महापालिका निवडणुकीची घोषणा करून बुधवार दि. 11 रोजी राज्य निवडणूक आयोगाने बेळगावसह राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. अचानकपणे निवडणूक जाहीर करण्यात आल्याने महापालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला होता. तातडीने निवडणूक अधिकारी व साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती करून शनिवारी प्रशिक्षण देण्यात आले होते. सोमवार दि. 16 पासून निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात आली असून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता दि. 6 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे दि. 16 ते 6 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत महापालिका व्याप्तीमध्ये नव्या कामाचा शुभारंभ करता येणार नाही. महापालिका निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
महापालिका निवडणुकीची घोषणा झाली होती, पण न्यायालयातील सुनावणीमुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता इच्छुकांनी तयारी चालविली होती. विविध दाखले मिळविण्यासाठी ते धावपळ करीत होते. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मतदार यादी, नो-डय़ूज प्रमाणपत्र आणि अर्ज घेण्यासाठी महापालिकेच्या कौन्सिल विभागात इच्छुकांनी गर्दी केली होती. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने विविध ठिकाणी वॉर्डनिहाय निवडणूक कार्यालय सुरू करून निवडणूक अधिकारी व साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांनी कामकाज सुरू केले आहे.









