वार्ताहर/ हुबळी
हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीला रंच चढलेला असतानाच शुक्रवारी रात्री उशिरा कारमधून अवैधपणे नेण्यात येणारे 82 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी कारचालक गोकुलराम विराराम रबारी (वय 34) याला अटक करण्यात आली असून तो मुळचा राजस्थानमधील असून सध्या बागलकोट येथील टांगा स्टँड येथील रहिवासी आहे. हुबळीच्या केशवापूर पोलिसांनी ही कारवाई केली.
घटनेविषयी अधिक माहिती अशी की, बागलकोटहून हुबळीकडे येणारी कार (क्र. केए 36 एन 2055) पोलिसांनी कुसुगल रोडवरील ऑक्सफर्ड कॉलेजजवळ अडविली. यावेळी कारचालक गोकुलराम याला वाहनाची कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. त्यावेळी त्याची बोबडी वळली. त्यामुळे पोलिसांनी कारमध्ये तपासणी केल्यानंतर 82 लाख 75 हजार रुपये आढळून आले. सदर पैशांसंबंधीची कागदपत्रे सादर न केल्याने त्याला पोलीस स्थानकात आणून चौकशी करण्यात आली. त्याच्याविरुद्ध केशवापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्याजवळून सदर रक्कम, कार, दोन मोबाईल असा एकूण 87.79 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोकुलरामविरुद्ध सीआरपीसी 1973, भा. दं. वि. च्या कलम 379 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महापालिका निवडणूक काळात ही कारवाई करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा रंगली आहे. कोणत्यातरी पक्षाने मतदारांचे मन वळविण्यासाठी ही रक्कम आणली आहे का?, हवाल्यामार्फत ही रक्कम आणण्यात आली असावी का?, याविषयी अधिक तपास केला जात आहे.









