पुढील सुनावणी गुरूवार 19 रोजी दुपारी, निवडणूक होणार असल्याची चिन्हे
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीबाबत संपूर्ण शहरवासियांचे लक्ष धारवाड खंडपीठाच्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले होते. सदर न्यायालयात हुबळी-धारवाड महापालिका वॉर्ड आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली. आहे. त्यामुळे न्यायालयात तब्बल दीड तास अरग्युमेंट झाले. मात्र न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली नाही. पण पुढील सुनावणी गुरुवार दि. 19 पर्यंत लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत अद्यापही सस्पेंस कायम आहे.
महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. बुधवार दि. 11 रोजी निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. बेळगावसह हुबळी-धारवाड, गुलबर्गा महापालिकेची निवडणूक होणार आहे. मात्र याबाबत बेंगळूर उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. पण सुनावणी दि. 16 सप्टेंबरपर्यत लांबणीवर गेली आहे. त्यामुळे बेळगाव महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबत धारवाड खंडपीठाच्या उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सदर सुनावणी सोमवार दि. 16 रोजी दुपारी झाली. यावेळी बेळगाव महापालिकेच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या निवडणुकीच्या अर्जावर अरग्युमेंट झाले. तसेच हुबळी-धारवाड महापालिका आरक्षणा विरोधात आक्षेप घेवून निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी सरकारला नोटीस काढण्यात आली.
निवडणुकीच्या मुद्दय़ावर न्यायालयात दीड तास अरग्युमेंट झाले. पण न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली नाही, मात्र पुढील सुनावणी गुरुवारी करण्यात येईल असे न्यायाधीशांनी सागितले. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोमवारपासून महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण न्यायालयातील सुनावणीमुळे निवडणुकीला स्थगिती मिळेल का? असा संभ्रम निर्माण झाला होता. सदर न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली नसल्याने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळण्याची शक्मयता कमी असल्याचे कायदेतज्ञांचे मत आहे. त्यामुळे निवडणूक होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.









