प्रतिनिधी/ बेळगाव
मध्यान्ह आहार कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत. परंतु, राज्य सरकारकडून त्यांना कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. अत्यंत अल्पवेतनामध्ये त्यांना काम करावे लागत असून त्यामुळे घरखर्च चालणेही कठीण आहे. त्यामुळे राज्य सरकारने मध्यान्ह आहार कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ करावी, अशी मागणी अक्षरदासोह संघटनेच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली.
बुधवारी सुवर्णविधानसौधसमोरील आंदोलनस्थळी महिला स्वयंसेविकांनी आंदोलन केले. अंगणवाडी तसेच आशा कार्यकर्त्यांना राज्य सरकारकडून अनेक सेवासुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यांना वैद्यकीय सेवाही देण्यात आल्या आहेत. त्यांच्याप्रमाणेच काम करणाऱया मध्यान्ह आहार कर्मचाऱयांना मात्र कोणत्याही सुविधा नाहीत. केवळ अडीच हजार रुपयांमध्ये या महिला काम करत आहेत. एकीकडे वाढलेली महागाई तर दुसरीकडे अत्यल्प वेतन यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत. याचा विचार करून राज्य सरकारने मध्यान्ह आहार कर्मचाऱयांचे वेतन वाढवावे, त्यांना ओळखपत्रे द्यावीत व आरोग्याच्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
या आंदोलनाला बेळगावसह म्हैसूर, धारवाड, विजापूर, बळ्ळारी यासह उत्तर कर्नाटकातील संघटनेचे सदस्य उपस्थित होते. के. व्ही. भट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.