होशंगाबादमध्ये सर्वाधिक नुकसान : 24 जिल्हय़ांना दक्षतेचा इशारा
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशात अतिवृष्टीमुळे स्थिती बिघडू लागली आहे. होशंगाबादमध्ये मोठा पूर आल्याने सैन्याला मदतकार्यासाठी पाचारण करावे लागले आहे. एनडीआरएफच्या दोन तुकडय़ा देखील मदतीसाठी पोहोचणार आहेत. तर राजधानी भोपाळमध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने सखल भागात पाणी साचले आहे.
अतिवृष्टीमुळे राज्यातील 251 पैकी 120 बंधारे पाण्याने भरू लागले आहेत. बहुतांश धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने त्याखाली क्षेत्रांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. अतिवृष्टीमुळे नर्मदा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये बहुतांश जिल्हय़ांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने छिंदवाडा, विदिशा, सीहोर, राजगढ, शाजापूर आणि आगरमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. तर भोपाळ आणि इंदोरसह 18 जिल्हय़ांमध्ये यलो अलर्ट दिला आहे.
होशंगाबादमध्ये पूर तसेच सीहोर, रायसेन, सागरमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्वतःचा दौरा रद्द केला आहे. तातडीची बैठक बोलावून शिवराज यांनी मदत तसेच बचावकार्य गतिमान करण्याचे निर्देश अधिकाऱयांना दिले आहेत. नर्मदा आणि त्याच्या उपनद्यांची पातळी वाढली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये पुढील 48 तासांकरता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सतर्क असल्याची माहिती शिवराज यांनी दिली आहे.









