ऑनलाईन टीम / भोपाळ :
कोरोनावरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा देशात तुटवडा निर्माण झाल्याने त्याचा काळाबाजारही वाढला आहे. त्यातच बाजारात बनावट रेमडेसिवीरचीही विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. इंदौर पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर प्रकरणी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून 400 बनावट ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.
विनय शंकर त्रिपाठी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची इंदौरमध्ये पिथमपुर येथे औषध कंपनी आहे. बाजारात ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा तुटवडा असल्याचा गैरफायदा घेत त्याने पैसे कमविण्याचे ठरवले. त्याच्या हिमाचल प्रदेशातील औषध कंपनीमध्ये या इंजेक्शनची निर्मिती केली जात होती. जप्त करण्यात आलेली इंजेक्शन बाजारात 20 लाख रुपयांना विकली जाणार होती. दरम्यान, त्याने आतापर्यंत बाजारात किती इंजेक्शनची विक्री केली आहे, याचा तपास सुरू आहे.