माधवबागचे डॉ. प्रसाद देशपांडे यांचे मत : समर्थ सोसायटीतर्फे व्याख्यानमाला-आरोग्य शिबिर
प्रतिनिधी /बेळगाव
वाळवी जशी लाकडाला पोखरते तसेच मधुमेह हा शरीराला आतून पोखरून टाकणारा विकार आहे. म्हणूनच त्याला सायलेंट किलर असे म्हटले जाते. पंचकर्म, योग्य डाएट, नियमित व्यायाम, स्ट्रेस मॅनेजमेंट व औषधे बंद करून या विकारातून कायमचे बरे होता येते. म्हणजेच 90 दिवसांत मधुमेह रिव्हर्स करता येतो, असे विचार माधवबाग आरोग्य संस्थेचे कर्नाटक विभागप्रमुख डॉ. प्रसाद देशपांडे यांनी बोलताना व्यक्त केले.
समर्थ अर्बन सोसायटीच्यावतीने रौप्यमहोत्सवानिमित्त खानापूरच्या शिवछत्रपती स्मारकातील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘मधुमेहमुक्त भारत’ या विषयावर ते बोलत होते. बेळगाव येथील समर्थ अर्बन को-ऑप. सोसायटीने आपल्या रौप्यमहोत्सवानिमित्त यावषी समर्थ व्याख्यानमालेबरोबरच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन खानापुरात केले होते.
या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. प्रसाद देशपांडे यांनी गुंफले. ते म्हणाले, एकदा झालेला मधुमेह हा मरेपर्यंत राहतो, असाच आजवर गैरसमज करून देण्यात आला आहे. ‘मधुमेहामुळे अगदी केस गळण्यापासून पायाच्या नखापर्यंत शरीराच्या बऱयाच अवयवांवर परिणाम होतो. त्यामुळे रुग्णाचे मानसिक, शारीरिक संतुलन तर बिघडतेच. पण आर्थिकदृष्टय़ा तो अडचणीत येतो.
श्रीमंतांचा आजार म्हणून ज्या मधुमेहाला वीस वर्षांपूर्वी म्हटले जायचे तो आता सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला आहे. त्याला परतवून लावणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी माधवबागने एक मोहीम राबवली आहे. समर्थला बरोबर घेऊन आम्ही बेळगाव आणि परिसरात यादृष्टीने कार्यरत आहोत. भारतातील फक्त 1 टक्का लोक मधुमेह प्रकार एकचे रुग्ण आहेत तर बाकीचे सर्व प्रकार दोनचे रुग्ण आहेत. असे सांगून मधुमेह होऊच नये, यासाठी वजनावर नियंत्रण ठेवा, आहार, व्यायाम व मेडिटेशन करत रहा, प्रामुख्याने तणावामुळे होणाऱया या रोगाची लागण होऊ नये, यासाठी इगो टाळा, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाची सुरुवात करताना राजा शिवछत्रपती स्मारक समितीचे संचालक बी. बी. पाटील म्हणाले, आमच्या संस्थेला व समर्थ सोसायटीला यंदा 25 वर्षे होत आहेत. त्यामुळे यावषी अनेक व्याख्याने संयुक्तरीत्या आयोजित करण्याचे आम्ही ठरविले आहे, असे सांगून खानापूरकरांतर्फे उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना समर्थ सोसायटीचे चेअरमन एन. डी. जोशी म्हणाले, खानापूरला शाखा सुरू केल्यानंतर चार दिवसांतच लॉकडाऊन झाल्यामुळे आम्हाला कोणताच कार्यक्रम करता आला नाही. त्यामुळे पूजाविधीसारख्या गोष्टींना फाटा देऊन खानापुरातील लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने काहीतरी करावे, असे आम्ही ठरविले. त्यातूनच माधवबागच्या साहाय्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व व्याख्यान आयोजित केले आहे.
स्मारक समितीचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी उपस्थितांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 100 हून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. समर्थ सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुहास कुलकर्णी यांनी आभार मानले.









