प्रत्येक मतमोजणी कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे, मतमोजणी कक्षाच्या बाहेरदेखील सीसीटीव्ही कॅमेरे, मतमोजणीसाठी 300 हून अधिक कर्मचाऱयांची नियुक्ती, प्रवेशद्वाराच्या आत नागरिकांना प्रवेश नाही

प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या निवडणुकीत 58 जागांकरिता शुक्रवारी मतदान झाले. सोमवार दि. 6 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून बी. के. मॉडेल येथे मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. निवडणूक यंत्रणेने मतमोजणीची सर्व तयारी केली असून याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी 9.30 वाजेपर्यंत पहिला निकाल लागण्याची शक्मयता आहे.
बी. के. मॉडेल शाळेमध्ये मतमोजणीसाठी 12 खोल्या सज्ज करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी प्रत्येक दोन टेबल ठेवण्यात आले असून काऊंटिंग एजंटांसाठी जाळी लावून कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तर तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर मतमोजणी प्रक्रिया चालणार आहे. निवडणूक नोडल अधिकारी व निवडणूक अधिकाऱयांचा कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. मत यंत्रे ठेवण्यात आलेला कक्ष सील करण्यात आला असून 24 तास पोलीस पहारा आहे. मतमोजणीसाठी 300 हून अधिक कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतमोजणी कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून कोणत्याही प्रकारे गोंधळ होवू नये, याकरिता मतमोजणी कक्षाच्या बाहेरदेखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
निकालाची माहिती देण्यासाठी लाऊडस्पीकरची व्यवस्था
शाळेच्या आवारात काऊंटिंग एजंटांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराच्या आत नागरिकांना प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे रस्त्यावर थांबूनच निकाल ऐकावा लागणार आहे. त्यामुळे निकालाची माहिती देण्यासाठी लाऊडस्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे काम रविवारी सुरू होते. सकाळी 7 पासून या प्रक्रियेस प्रारंभ होणार असून निवडणुकीच्या निकालाची घोषणा 12 पर्यंत पूर्ण होण्याची शक्मयता आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर व परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
निवडणूक रिंगणात 385 उमेदवार असून सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. उमेदवारांना हूरहूर लागली असून निकाल कुणाच्या बाजूंनी लागणार? याबाबत चिंता वाढू लागली आहे. तर रविवारी सुटीचा दिवस असल्याने अनेकजण निकालाच्या मुद्दय़ांवर चर्चा करीत असल्याचे आढळून आले. तसेच महापालिकेत यंदा नवीन चेहरा कुणाचा दिसणार? याबाबत सर्वांनाच उत्कंठा लागली आहे.









