जि. पं. मतदारसंघांची संख्या वाढणार, ता. पं. संख्या होणार कमी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका संपल्यानंतर आता राजकीय पक्षांना आणखी एका निवडणुकांसाठी सज्ज व्हावे लागणार आहे. यावेळी 110 जिल्हा पंचायत मतदारसंघ वाढणार आहेत तर 600 तालुका पंचायत मतदारसंघ रद्द होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मतदारसंघ पुनर्रचनेसंबंधी मार्गसूची जारी केली आहे. या मार्गसूचीनुसार मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. अलिकडेच संबंधित जिल्हाधिकाऱयांनी पुनर्रचनेची माहिती आणि नकाशा 19, 20 आणि 22 फेब्रुवारी रोजी आयोगाकडे सादर केला आहे. मंगळूर आणि शिमोगा जिल्हय़ातील मतदारसंघ पुनर्रचनेची माहिती आणि नकाशा अद्याप सादर होणे बाकी आहे.
तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीसंबंधी राज्य निवडणूक आयोगाने मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया हाती घेतली आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा सोमवारी पूर्ण झाला. या आठवडा अखेरीस दुसऱया टप्प्यातील पडताळणीचे काम पूर्ण करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदारसंघांची माहिती आणि नकाशा सादरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर अधिसूचना जारी करण्यात येण्याची शक्यता आहे.
राज्यात तालुका पंचायत मतदारसंघांमधील मतदारांचे प्रमाण 10 हजारवरून 12,500 पर्यंत वाढविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा पंचायतींमध्ये मतदारांचे प्रमाण 40 हजारवरून 35 हजारावर आणण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत मतदारसंघांची संख्या 110 ने वाढणार आहेत. तर सुमारे 600 तालुका पंचायत मतदारसंघ रद्द होणार आहेत.
मे, जूनमध्ये कार्यकाळ संपणार
मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरक्षण जाहीर होणार आहे. आरक्षणाची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 45 दिवसांत निवडणुकीची घोषणा होण्यार आहे. मे आणि जून महिन्यात तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.









