हिंडलगा : आंबेवाडी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया मण्णूर गावातील गटारींची साफसफाई करावी व कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी औषध फवारणी करण्याच्या मागणीसाठी हिंदवी स्वराज्य संघटनेच्यावतीने मंगळवारी ग्राम पंचायतीला निवेदन देण्यात आले.
सध्या गावातील गटारी सांडपाणी व कचऱयाने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शिवाय पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नाही. यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी गटारींची साफसफाई करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी. तसेच सर्वत्र कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पंचायतीमार्फत औषध फवारणी करून परिसर निर्जंतूक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी ग्राम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील यांनी निवेदन स्वीकारून त्वरित साफसफाईला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपाध्यक्षा सरिता नाईक, सदस्य मधुकर चौगुले, दत्तू चौगुले, नागेश चौगुले, सदस्या लता कडोलकर, लक्ष्मी सांबरेकर, लक्ष्मण यळगुकर यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर बाळेकुंद्री, नारायण शहापूरकर, डॉ. भरत चौगुले, परशराम कदम, राहूल मंडोळकर, वैजनाथ चौगुले व कार्यकर्ते उपस्थित होते.









