भारत तुटलेला आहे ः देशाचा अपमान केल्याची भाजपची टीका
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या एका विधानामुळे वाद उभा ठाकला आहे. भारत तुटलेला असल्यानेच त्याला जोडण्याची गरज आहे. भारत जोडो यात्रेचा उद्देश देखील हाच असल्याचे विधान अय्यर यांनी केले आहे. अय्यर यांचे हे विधान देशाचा अपमान करणारे असल्याचे म्हणत भाजपने जोरदार टीका केली आहे.
धर्म, भाषा, जाती, संस्कृतीच्या आधारावर भारताला तोडण्याचा प्रयत्न संघ परिवाराचे लोक करत आहेत. संघ परिवाराच्या विरोधात ही यात्रा सुरू आहे. भारताला जोडण्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे या यात्रेचा उद्देश भारत जोडो हाच आहे. भारत तुटलेला असल्यानेच त्याला जोडण्याची गरज आहे. या यात्रेचा उद्देश निवडणुकीच्या राजकारणाचा नाही. निवडणुकीसाठीचे काम यात्रा संपल्यावर सुरू होणार असल्याचा दावा अय्यर यांनी केला आहे.
अय्यर यांच्या या विधानानंतर भाजपने काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. अय्यर यांचे विधान हे सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान करणारे आहे. काँग्रेस पक्ष वारंवार पटेल यांच्या योगदानाचा अपमान करत आहे. पटेल यांनीच भारत जोडला होता, आता काँग्रेस पक्ष भारत तुटल्याचे आणि राहुल गांधी तो जोडत असल्याचे सांगतोय. राजस्थान, दिल्लीपासून अनेक राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचेच अनेक तुकडे झाले आहेत. देशाची फाळणी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाकांक्षेमुळेच झाली होती. 1947 मध्ये भारत तोडला गेला होता अशी टीका भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली आहे.









