मडगावातील न्यू मार्केट 31 रोजी खुले होणार
प्रतिनिधी/ मडगाव
मडगावातील न्यू मार्केट शुक्रवार 31 रोजी खुले करण्यात येणार असल्याची माहिती न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी दिली आहे. शिरोडकर यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशातून वरील माहिती देण्यात आली आहे. संघटनेचे गोपाळ नाईक, विराज आमोणकर, नरेश गावकर व अन्य पदाधिकारी तसेच राजेंद्र आजगावकर यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली आहे.
मार्केट परिसरातील हॉटेलात कित्येक जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आमचा एक व्यापारी कोरोनाला बळी पडला याचे आम्हाला दु:ख आहे. मार्केटमधील कित्येकांनी कोरोनाच्या चाचण्या करून घेतल्या आहेत व देवाच्या कृपेने सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. ?अजूनही काहींच्या चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर आणखी 4 दिवस मार्केट बंद ठेवून ते शुक्रवार 31 रोजी उघडल्यास उपयुक्त ठरेल. तीन दिवसांचा सरकारी लॉकडाऊन व नंतर आम्ही स्वच्छेने केलेला आठवडाभराचा लॉकडाऊन असे मिळून 11 दिवस होतात. त्यात आणखी 4 दिवस बाजारपेठ बंद ठेवल्यास उरलीसुरली शंका मिटेल. त्यात पालिकेने पुन्हा एकदा बाजारात निर्जंतुकीकरण करावे अशी विनंती नगराध्यक्षा पूजा नाईक यांना करण्यात आली असून त्यांनी ती मान्य केली आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
व्यापाऱयांनी चार दिवस कळ सोसावी
मार्केटसभोवतालील परिसरातही औषधफवारणी करण्यात आली आहे. येथील बँक ऑफ बडोदा व नजीकच्या भागात आढळणारे भिकारी व अन्य बेघरांना हटविण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत असे आपण नगराध्यक्षांना सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. व्यापाऱयांनी घाई न करता आणखी 4 दिवस कळ सोसून मार्केट बंद ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष शिरोडकर यांनी केले आहे.
मडगावातील न्यू मार्केट सोमवारपासून सुरू करण्याच्या हालचाली काहींनी सुरू केल्या होत्या. न्यू मार्केटमध्ये दोन व्यापारी संघटना असून त्यापैकी एका संघटनेचे अध्यक्ष देविदास बोरकर यांनी शुक्रवारी एका व्हिडीओ संदेशातून सोमवारपासून न्यू मार्केट खुले केले जाणार असल्याची माहिती दिली होती. या मार्केटातील व्यापाऱयांना आणखी जास्त दिवस दुकाने बंद ठेवणे परवडणार नाही, असे त्यांनी त्यात म्हटले होते. या निर्णयाविषयी मडगावच्या नगराध्यक्षांना कळविण्यात आले असल्याचे बोरकर यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर शिरोडकर यांनी वरील भूमिका स्पष्ट केली आहे.









