रितेश नाईक यांचे उद्गार : मडकई भाजपातर्फे स्वागत
प्रतिनिधी/ फोंडा
भाजपातील पक्षश्रेष्ठींकडून मडकई मतदार संघात काम करण्याची संधी दिल्यास आपल्याला ते निश्चितच आवडेल. पक्षाचा विस्तार करतानाच 2012 सालच्या निवडणुकीत येथील मतदारांनी जी आठ हजार मते दिली होती, त्याचे ऋण फेडता येईल. तेथील एकाधीकारशाही विरोधात जनता आपल्याला निश्चितच साथ देईल असे उद्गार नुकताच भाजपा प्रवेश केलेले फोंडय़ाचे नगरसेवक रितेश रवी नाईक यांनी काढले.
रितेश यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल मडकई भाजपा मंडळातर्फे आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते. खडबांध-फोंडा येथे झालेल्या या कार्यक्रमाला मडकई भाजपाचे अध्यक्ष प्रदीप शेट, भंडारी समाजाचे नेते अनिल होबळे व भाजपाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. येणाऱया काळात मडकई मतदार संघात पक्ष विस्तार व जनतेची काम करण्यासाठी नव्याने सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रितेश नाईक व रॉय नाईक यांच्या भाजपाप्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. येणाऱया काळात फोंडा तालुक्यातील चारही मतदार संघात भाजपाचा हा वाढता प्रभाव दिसून येईल. मडकई मतदार संघात मगो पक्षाच्या नावाखाली चाललेल्या घराणेशाहीच्या राजकारणाला निश्चितच हादरा बसेल. जिल्हा पंचायत निवडणुकीत त्याची नांदी पाहायला मिळणार, असे प्रदीप शेट यावेळी बोलताना म्हणाले.
अनिल होबळे म्हणाले, काँग्रेस व अन्य पक्षातील अनेक नेते आज भाजपाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे एकेकाळी एका विशिष्ट जातीचा पक्ष म्हणून भाजपावर असलेला ठपका पुसून जाणार आहे. रितेश व रॉय नाईक यांचा भाजपाप्रवेश हा योग्यवेळी घेतलेला योग्य निर्णय आहे. मडकई भाजपा मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन रितेश नाईक यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.









