दोघेही ओल्ड गोवा येथील : नोकरीसाठी मुलाखत देऊन परतताना काळाचा घाला
प्रतिनिधी / फोंडा
मडकई-कुंडई बगलरस्त्यावर मालवाहू ट्रक व बुलेट मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघा बुलेटस्वार युवकांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी 12.30 वा. सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकखाली अडकलेल्या मोटारसायकलने पेट घेतल्याने उडालेल्या आगीच्या भडक्यात ट्रकचा कॅबिनकडील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. रितेश चंद्रकांत कुडीनूर (20, रा. सेंट पॉल चॅपेलजवळ, ओल्ड गोवा) व आकाश महादेव ओसमणी (19, रा. काटयेंभाट-ओल्ड गोवा) अशी ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
रितेश व आकाश हे दोघेही मंगळवारी सकाळी मडकई येथील एका खासगी आस्थापनात नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी गेले होते. तेथून परत येताना हा अपघात घडला.

बुलेट-ट्रकची समोरासमोर भीषण धडक
मुलाखत आटोपल्यानंतर जीए 07 एडी 9148 या क्रमांकाच्या बुलेटवरुन मडकईहून कुंडई औद्योगिक वसाहतीकडे येणाऱया बगलरस्त्याने ते घरी परतत होते. यावेळी येथील एका छोटय़ा वळणावर समोरुन येणाऱया जीए 05 टी 1492 या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकला बुलेटची समोरासमोर जोरदार धडक बसली.
ही धडक एवढी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ट्रकखाली अडकलेली त्यांची मोटारसायकल काही अंतरापर्यंत रस्त्यावर घासत पुढे गेली. कडक उन्हात तापलेल्या रस्त्यावर स्पार्क होऊन त्यास पेट्रोल मिळाल्याने आगीने पेट घेतला. काही वेळातच आगीचा मोठा भडका उडाला व मोटारसायकलसह ट्रकच्या कॅबिनकडील भाग जळून पूर्ण खाक झाला. प्रसंगावधान राखून ट्रकचालक रामबली चौधरी (44, रा. कोलकाता) याने कॅबिनबाहेर उडी घेऊन पळ काढल्याने तो या दुर्घटनेतून बचावला. दोन्ही वाहनांमध्ये झालेली धडक एवढी जबरदस्त होती की, रितेश व आकाश यांच्या डोक्यासह शराराच्या चिंधडय़ा उडाल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच कुंडई अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी धावला. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणली. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविले आहेत.
अपघातानंतर पोलिसांना शरण आलेल्या ट्रकचालकाला सायंकाळी अटक करण्यात आली आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रश्मी भाईडकर या अधिक तपास करीत आहेत. कुंडई अग्निशामक केंद्राचे स्टेशन अधिकारी गणेश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक जवानांनी अपघातस्थळी मदतकार्य केले.
रितेशचा आज वाढदिवस होता
या अघातात ठार झालेला रितेश कुडीनूर याची जन्मतारीख 27 मे 2000 अशी आहे. त्यामुळे आज 27 रोजी त्याचा वाढदिवस होता. तो विसाव्या वर्षात पदार्पण करणार होता. पण त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या पश्चात आई, वडिल व तीन मोठय़ा बहिणी आहेत. दहावीचे शिक्षण पूर्ण करुन तो पणजी येथे कॅसिनोत कामाला होता. पण लॉकडाऊनमुळे हे काम बंद झाल्याने नवीन कामाच्या शोधात होता. मडकई येथील एका खासगी आस्थापनात कामाला मुले घेत असल्याचे कळल्याने आकाश व अन्य दोघा मित्रांसह तो मंगळवारी सकाळी मुलाखतीसाठी गेला होता. ज्या बुलेट मोटारसायकलला हा अपघात झाला ती रितेशच्या मालकीची असून वीस दिवसांपूर्वीच त्याने विकत घेतली होती.

आकाश ओसमणी याच्या पश्चात आई व एक मोठा भाऊ आहे. काही महिन्यापूर्वी तो एका खासगी वाहनावर चालक होता. हे काम बंद झाल्याने तो नवीन कामाच्या शोधात होता. रितेश व अन्य दोघा मित्रांसह तो मडकई येथे खासगी आस्थापनात मुलाखतीसाठी गेला होता. त्याची आई एका शाळेत सफाई कामगार म्हणून कामाला आहे.









