वार्ताहर/ हुक्केरी
तालुक्यातील शिरढाण गावातील वॉटरमनला मगरीने घटप्रभा नदीत ओढून नेल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान वॉटरमनचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू असून त्यांना शोधमोहिमेत अद्याप यश आलेले नव्हते. बसवराज यमनाप्पा हरीजन (वय 35) असे सदर वॉटरमनचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, दररोजच्या प्रमाणे मंगळवारीही घटप्रभा नदीवर असलेली पाण्याचे मोटर चालू करण्यात आली होती. पण पाणी येत नसल्याने व्हॉलमध्ये काही तरी अडकले असेल म्हणून बसवराज हा पाण्यात उतरला होता. याचवेळी त्याच्यावर मगरीने हल्ला करुन त्याला पाण्यात ओढून नेले. सदरची घटना त्याच्यासोबत असलेल्या अन्य एकाने पाहिल्याने सर्वांना ही घटना समजली. तात्काळ या घटनेची माहिती मिळताच हुक्केरी येथील अग्निशमन दलाने बसवराजचा शोध सुरू केला आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी शोध कार्य सुरु होते. पण त्याचा शोध लागला नव्हता.
मगरीचा वाढता वावर चिंताजनक
घटप्रभा नदीत गेल्या अनेक वर्षापासून मगरीचा वावर वाढतच चालला आहे. यंदाही पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील सावळगीजवळ 18 ते 20 मगरीच्या पिल्लांना पकडून वनखात्याकडे सुपूर्द करण्यात आले होते. तसेच मगरीचे अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी दर्शन घडले आहे. मात्र आतापर्यंत कोणतीही दुर्घटना घडलेली नव्हती. मात्र मंगळवारी प्रथमच एकाला मगरीने नदीपात्रात ओढून नेल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
बसवराजचा शोध घेताना अडचणी
घटप्रभा नदीत हिडकल डॅम व हिरण्यकेशी नदीतून दहा हजार क्युसेक पाणी सोडल्याने बसवराजचा मृतदेह शोधण्यात अडचणी येत आहेत. गतवर्षी आलेल्या पुरामुळे व नदीत पाणी जास्त असल्याने हुक्केरी, बेणीवाड, सुलतानपूर, बडकुंद्री, अर्जुनवाड व नदीकाठच्या भागात मगरींचे दर्शन घडले आहे. याची दखल घेत मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.









