
प्रतिनिधी /वास्को
विधानसभा निवडणुकीसाठी काल सोमवारी भाजपातर्फे दाबोळीतून मंत्री माविन गुदिन्हो यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्यानंतर काँग्रेसतर्फे मुरगाव मतदारसंघातून संकल्प आमोणकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. आतापर्यंत मुरगाव तालुक्यात दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काल सोमवार असल्याने या उमेदवारांनी वास्कोतील ग्रामदैवत श्री दामोदराचे दर्शन घेऊन विजयासाठी देवाचे आशिर्वादही घेतले.
मुरगाव तालुक्यातील वास्को, मुरगाव, दाबोळी व कुठ्ठाळी अशा चारही मतदारसंघांसाठी उमेदवार अर्ज स्विकारण्याची सोय बायणातील रविंद्र भवनात करण्यात आलेली आहे. मुरगाव पालिका इमारतीच्या नुतनीकरणाचे काम चाललेले असल्याने मुरगावचे उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुरगावचे मामलेदार कार्यालयाचे रविद्र भवनात स्थलांतर करण्यात आलेले असून या कार्यालयांच्या अस्तित्वामुळे आता रविंद्र भवनमधील वर्दळ बरीच वाढलेली आहे. सध्या विधानसभा निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्याने या ना त्या कामानिमित्त या कार्यालयात गर्दीही पडू लागलेली आहे. त्यात काल उमेदवारी अर्ज भरण्याच्यानिमित्ताने रविंद्र भवनचा आवार आणि आवाराबाहेरही लोकांची गर्दी होती. मुरगावचे उपजिल्हाधिकारी तसेच निर्वाचन अधिकारी दत्तराज गावस व शर्मिला गावकर यांनी उमेदवारी अर्ज स्विकारले.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र, काल सोमवारपासून उमेदवार अर्ज भरण्याला प्रारंभ झाला आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी पहिला उमेदवारी अर्ज मंत्री माविन गुदिन्हो यांनी सादर केला. ते दाबोळीतून दोन वेळा विजयी झालेले असून यंदा भाजपाच्या उमेदवारीवर दुसऱयांदा निवडणुक लढवीत आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गुदिन्हो यांनी दाबोळीत आपण भरीव विकास केलेला आहे. याची लोकांना जाणीव आहे. त्यामुळे आपण दाबोळीतून तिसऱयांदा नक्कीच विजयी होईन. दाबोळीतून सुरू होणारी भाजपाच्या विजयाची हवा वास्को, मुरगाव व कुठ्ठाळीपर्यंत जाईल व चारही मतदारसंघात भाजपा विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर मुरगाव मतदारसंघातून काँग्रेस तर्फे तिसऱयांदा निवडणुक रिंगणात उतरलेले आहेत. काल सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी गोव्यातील जनतेला आता बदल हवा आहे. सबंध गोव्यात भाजपा सरकारविरूध्द नाराजी असून मुरगावची जनतासुध्दा काँग्रेसबरोबरच राहील. मुरगावची जनता स्थानिक आमदार व सरकारविरूध्द संतप्त आहे, नाराज आहे. जनतेच्या बळावर यंदा आपण निश्चित विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मंत्री माविन गुदिन्हो, माजी आमदार कार्लुस आल्मेदा तसेच संकल्प आमोणकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वास्कोतील ग्रामदैवत श्री दामोदराचे दर्शन घेऊन विजयासाठी आशिर्वाद घेतले.
वासनाकांडाचे आरोप सत्यावरच आधारीत, देव दामोदराच्या साक्षीने संकल्प आमोणकर यांचा पुनर्रूचार
दरम्यान, संकल्प आमोणकर यांनी पत्नी व नगरसेविका श्रध्दा आमोणकर तसेच आई वडिल, मुले व बंधुंच्या उपस्थितीत श्री दामोदराच्या साक्षीने श्रीफळावर हात ठेवून आपण आमदार मिलिंद नाईक यांच्यावर वासनाकांड प्रकरणी जे काही आरोप केलेले आहेत ते सत्य असल्याचा पुनर्रूचार केला. आपण केलेले आरोप सत्यावर आधारीत असून विरोधकांकडून मात्र, गुन्हे लपवण्यासाठी आपल्यावर असत्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळेच आपण कुटुंबियांसह सत्य तेच देवासमोर मांडलेले आहे. वासनाकांड खरे की खोटे याची पुढील लढाई आता न्यायालयातच होईल असे त्यांनी स्पष्ट केले. वासनाकांड प्रकरण खोटे ठरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याने हे प्रकरण खरे की खोटे हे सिध्द करण्यासाठी आमदार मिलिंद नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात यावे किंवा एखादय़ा हॉलमध्ये हजर राहावे असे आव्हान मुरगाव काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यानी दिले होते. मात्र, आमदार मिलिंद नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या आव्हानाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी आव्हान स्विकारले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.









