- बदलीसाठी शरद पवारांचा आवाज काढत एका व्यक्तीने थेट मंत्रालयात केला फोन
ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढत बदलीसाठी एका व्यक्तीने थेट मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना फोन केला. या फोनमुळे एकच खळबळ उडाली असून अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीने मंत्रालयात फोन केला. मी सिल्व्हर ओक निवासस्थान येऊन बोलतोय, असे म्हणत या व्यक्तीने फोन घेणाऱया अधिकाऱयासोबत बदल्यांसदर्भात चर्चा केली. मी शरद पवार बोलत असल्याचे सांगून या व्यक्तीने अमुक एका अधिकाऱयाची अमुक ठिकाणी बदली करावी असे सांगितले. दरम्यान, या कॉलबाबत शंका वाटल्याने खातरजमा करण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱयाने सिल्व्हर ओक येथे कॉल केला. त्यावर साहेबांनी असा कोणताही कॉल केलेला नाही, असे तिथून सांगण्यात आले. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत याबाबत पोलिसांना खबर देण्यात आली.
दरम्यान, शरद पवारांच्या नावाने फेक कॉल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. हा कॉल त्यांनीच केला होता का ?, हा कॉल करण्यामागे काय हेतु होता ?, शरद पवार यांचे नाव का वापरण्यात आले ?, या विविध मुद्यांवर पोलिसांचा तपास सुरू आहे.









