विश्वासात न घेता डिजीटल लायब्ररीचे बांधकाम सुरू केल्याने संतप्त
वार्ताहर /हिंडलगा
मंडोळी येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळा सुधारणा कमिटीला विश्वासात न घेताच पटांगणावर रुर्बन योजनेंतर्गत डिजीटल लायब्ररीचे बांधकाम सुरू केल्याने संतप्त झालेल्या कमिटीच्या सर्व सदस्यांनी सोमवार दि. 6 रोजी आपल्या पदांचे राजीनामा दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आणि शिक्षण खात्याचा गलथान कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
याबाबत शाळा सुधारणा कमिटीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाच्या रुर्बन योजनेंतर्गत गावासाठी डिजीटल लायब्ररी मंजूर झाली आहे. पण, सदर इमारतीचे बांधकाम सरकारी मराठी शाळेच्या पटांगणात करण्यासाठी ग्रा.पं.ने खटपट चालवली होती.
याबाबत माहिती मिळताच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान अपुरे पडणार असल्याने शाळा सुधारणा कमिटीच्या सदस्यांनी सदर इमारत बांधकामाला विरोध करून गावातील इतर सरकारी जागेवर ही इमारत बांधावी, यासाठी जि. पं. अधिकारी व शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांना निवेदन दिले होते. तरीदेखील सदस्यांना विश्वासात न घेताच लायब्ररीचे बांधकाम शाळेच्या पटांगणात सुरू करण्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायतीने देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या सर्व 18 सदस्यांनी सोमवारी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
यावेळी शाळा सुधारणा कमिटी सदस्य जोतिबा आंबेवाडीकर, लक्ष्मी दळवी, यल्लाप्पा पाटील, श्रीकांत शहापूरकर, मारुती पाटील, लक्ष्मण शहापूरकर, विष्णू कांबळे, किरण पाटील, जोतिबा पाटील, परशराम दळवी, गंगा पाटील, निशा राऊत, संजना पाटील, कविता हुंदे, उज्ज्वला बेळगावकर, सुनीता पाटील, अनिता पाटील, लक्ष्मी शहापूरकर उपस्थित होते.









