प्रतिनिधी/ मंडणगड
मंडणगडच्या नगराध्यक्षा आरती तलार यांना आमदार योगेश कदम यांच्या नावाने धमकीचा फोन करण्यात आल्याची तक्रार 2 ऑक्टोबर रोजी मंडणगड पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
तलार यांच्या तक्रार अर्जातील माहितीनुसार, 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 ते 8 च्या सुमारास अनोळखी दूरध्वनी क्रमांकावरून नगराध्यक्षांच्या मोबाईलवर फोन आला व त्यांनी तो फोन उचलला असता समोरील अनोळखी व्यक्तीने मी आमदार योगेश कदम बोलत असल्याचे सांगून ‘मंडणगड गांधी चौकातील स्मशानभूमी नूतनीकरण कामाच्या उद्घाटन समारंभाच्या पाटीवर माझे नाव नाही, माजी आमदारांचे नाव टाकलेत, एका सभापतींचा उल्लेख पाटीवर नाही, बाकी सगळ्यांची नावे टाकलीत, उद्या तुमच्यावर केस होऊ शकते तसेच तुमच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते, तुम्ही नगराध्यक्षा आहात, तुम्हाला याची माहिती हवी, उद्या या सगळ्या प्रकरणाचा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे, यात तुमचे पद जाऊ शकते’ असे बोलून तुमचे पद घालवायला वेळ लागणार नाही, अशा स्वरुपाची धमकी दिली.
त्यानंतर घाबरल्यामुळे नगराध्यक्षा तलार यांनी आपल्या मोबाईलमधील सीम काढून टाकले. त्यामुळे मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड डिलीट झाले. त्यामुळे नगराध्यक्षांना आलेला दूरध्वनी कोणत्या क्रमांकावरुन आलेला होता, हे समजू शकले नसल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. आपण सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील महिला असल्याने स्वतःला व कुटुंबाला त्रास नको म्हणून धमकीचा फोन आल्यानंतरही पोलिसांत ताबडतोब तक्रार दिली नाही. आपले सर्व कुटुंब भीतीच्या छायेखाली असून मंडणगड शहराचे प्रतिनिधीत्व करताना अशा स्वरुपाची धमकी येणे, ही खेदाची गोष्ट आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कडक करावाई करावी, अशी मागणी नगराध्यक्षा तलार यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. यासंदर्भात मंडणगड पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, नगराध्यक्षा तलार यांचा तक्रार अर्ज पोलिसांनी दाखल करुन घेतला असून पुढील तपास सुरु केला आहे.









