अमेरिकेत प्रथमच मुलांमध्ये संसर्ग आढळला, भारतासह 80 देशांमध्ये 16 हजार 886 रुग्ण
कॅलिफोर्निया / वृत्तसंस्था
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शनिवारी मंकीपॉक्सच्या संसर्गाला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले. शनिवारी झालेल्या बैठकीत दीर्घ चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. मंकीपॉक्सचा प्रसार आतापर्यंत 80 देशांमध्ये झाला आहे. भारतात आतापर्यंत या विषाणूचे 3 रुग्ण आढळले असून ते केरळमधीलच आहेत. दुसरीकडे, अमेरिकेत प्रथमच दोन मुलांमध्ये हा संसर्ग आढळून आला आहे. दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य अधिकाऱयांनी सांगितले. सावधगिरीसाठी अमेरिकन सरकारने आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांपर्यंत मंकीपॉक्स लस पोहोचवल्या असून लवकरच लसीकरण मोहीम सुरू होईल.
ब्रिटनमध्ये 6 मे रोजी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला. हा रोग संसर्गजन्य असल्याने अनेक देशांमध्ये पसरला आहे. रुग्णाच्या संपर्कात आल्याने किंवा त्याला अन्न दिल्यानेही संसर्ग पसरतो. याशिवाय संक्रमित व्यक्तीचे कपडे, भांडी आणि बिछान्याला स्पर्श केल्यानेही मंकीपॉक्स पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते. भारतासह 80 देशांमध्ये 16,886 रुग्णांची पुष्टी झाली आहे. यापैकी युरोपमध्ये सर्वाधिक 11,985 लोक मंकीपॉक्सने बाधित झाले आहेत. सर्वाधिक रुग्ण असलेल्या 10 देशांमध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम यांचा समावेश आहे. मंकीपॉक्सने यावषी आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतला आहे.









