डॉक्टर धारेवर : रुग्णांवर योग्य उपचाराचा सल्ला
प्रतिनिधी / बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी एक हजार बेड्स उपलब्ध आहेत, अशी माहिती लोकप्रतिनिधींनी दिली होती. तरीदेखील काही रुग्णांना तेथून खासगी रुग्णालयात जायला सांगितले. यामुळे म. ए. युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधला असता 1 हजार बेड्स नाहीत तर 300 बेड कोविडसाठी राखीव ठेवल्याचे सांगितले.
300 बेड्समधील 120 बेडवर रुग्ण आहेत तर अजूनही 180 बेड खुले आहेत. त्यामुळे आम्ही कुणालाही बाहेर जाण्यास सांगितले नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यावेळी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे यांनी तुमचे कर्मचारी रुग्णांना खासगी रुग्णालयात जा, असे सांगत आहेत. तेव्हा संबंधितांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी केली.
आम्ही कोविड रुग्णांसाठी सर्व ती तयारी केली आहे. या ठिकाणी ऑक्सिजनचीही सोय आहे. त्यामुळे रुग्णांना घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे सांगितले. मात्र, मदन बामणे आणि शुभम शेळके यांनी हॉस्पिटलबद्दल असल्या तक्रारी तसेच लोकप्रतिनिधींनी दिलेली खोटी माहिती ही जनतेची दिशाभूल करणारी आहे. तेव्हा सर्वसामान्य जनतेला डॉक्टर असोत किंवा लोकप्रतिनिधी खरी माहिती द्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. कोविड लसदेखील अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोविड लस घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले आहे. तेव्हा कोविड लसही उपलब्ध करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी म. ए. युवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









