प्रतिनिधी /खानापूर
येथील तहसीलदार कार्यालयात असलेल्या लॅण्ड सर्व्हे विभागातील एका भूमापकाला लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी धाड घालून रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. लोकायुक्तांच्या जाळय़ात सापडलेल्या भूमापकाचे नाव अशोक वाय. मदनाळ असे आहे.
सुरापूर ता. खानापूर येथील शेतकरी शशिकांत रामचंद्र तळवार यांनी आपल्या शेतजमिनीचा ईलेव्हन-ई नकाशा मिळविण्यासाठी खानापूरच्या लॅण्ड सर्व्हे ऑफिसकडे अर्ज केला होता. सदर उतारा देण्यासाठी भूमापक अशोक मदनाळ यांनी तळवार यांच्याकडे 10 हजार रुपयाची मागणी केली होती. त्यावेळी तळवार यांनी अशोक यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण दहा हजार रुपये दिल्याशिवाय तुला ईलेव्हन-ई नकाशा मिळणार नाही, असे ठामपणे सांगितले. यामुळे शशिकांत तळवार यांनी त्याला आगाऊ चार हजार रुपये दिले होते. यानंतर शशिकांत यांनी अशोक मदनाळ यांच्याविरुद्ध बेळगाव उत्तर विभागाच्या लोकायुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन लोकायुक्त पोलीस मंगळवारी दुपारी खानापूर तहसीलदार कार्यालय आवारात दाखल झाले. त्यावेळी शशिकांत यांनी उर्वरित सहा हजार रुपये अशोक मदनाळ याला दिले. त्याचक्षणी लोकायुक्त पोलिसांनी धाड घालून सदर लाच स्वीकारताना अशोक मदनाळ याला रंगेहाथ पकडून पुढील कारवाई केली.
बेळगाव उत्तर विभागाचे लोकायुक्त बी. एस. नेमगौडा, लोकायुक्त डीवायएसपी करुणाकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकायुक्त पोलीस निरीक्षक सुनील कुमार, ए. एस. बुद्धीकोप्प यांनी त्यांच्या सहकाऱयांसह सदर धाड घालून अशोक मदनाळ याला अटक केली. खानापूर लॅण्ड सर्व्हे कार्यालयाविषयी यापूर्वीदेखील बऱयाच तक्रारी होत्या. गेल्या चार वर्षांत लोकायुक्तांच्या जाळय़ात सापडलेले अशोक मदनाळ हे खानापूर लॅण्ड सर्व्हे कार्यालयातील तिसरे भूमापक आहेत. यापूर्वीदेखील दोघे भूमापक अशाच पद्धतीने लोकायुक्त पोलिसांच्या जाळय़ात सापडले होते.









