अरुणाचलला लागून असलेल्या भागात चीनने वसविले गाव सैन्य तळ अन् ऊर्जा प्रकल्पही उभारला
वृत्तसंस्था / सिडनी
चीनने भूतानच्या 8 किलोमीटर आतमध्ये घुसखोरी करत ग्यालाफुल नावाने गाव वसविल्याचा खुलासा ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमाने केला आहे. तेथे चीनने रस्ते, इमारती आणि पोलीस स्थानक तसेच सैन्याचा तळही निर्माण केला आहे. या गावात ऊर्जा प्रकल्प, गोदाम आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे कार्यालय देखील आहे.
चीनच्या कब्जातील ग्यालाफुल गावात 100 हून अधिक लोक आणि तितक्याच संख्येत याक आहेत. बांधकाम मजुरांची तेथे ये-जा सुरू असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमाने सांगितले आहे. हा भाग भारताच्या अरुणाचल प्रदेशाला लागून आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशवर दावा केला जातो. याचमुळे भूतानची भूमी बळकाविण्यामागे खरे लक्ष्य भारत असल्याचे मानले जात आहे.
भूतान 140 कोटी लोकसंख्या असलेला देश अधिक विरोध करणार नसल्याचे चीनचे मानणे आहे. चिनी सैनिकांनी तेथे एक मोठा बॅनर लावला असून त्यावर ‘क्षी जिनिंपग यांच्यावरील विश्वास कायम ठेवा’ असे लिहिलेले आहे. सीमा वादावरून अलिकडेच दोन्ही देशांदरम्यान कुनमिंग शहरात 25 बैठका झाल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये 470 किलोमीटर लांबीची सीमा आहे. पण सीमेवरून भूतान आणि चीनच्या दाव्यांमध्ये फरक आहे.
या भूमीवर कब्जा करून चीन 1998 च्या कराराचे उल्लंघन करत आहे. चीनच्या या कब्जामुळे भूतानच्या लोकांमध्ये निराशा वाढत आहे. 1980 मध्ये चीनने सादर केलेल्या नकाशात ग्यालाफुग हे भूतानमध्ये दाखविण्यात आले होते.
चीन हे सर्व एका विशेष रणनीतिच्या अंतर्गत करत आहे. भूतानचे भारताचे मित्रत्वाचे संबंध आहेत. भूतानचा सर्वाधिक व्यापार भारतासोबतच होतो. याउलट भूतानमध्ये चीनचा दूतावास देखील नाही. चीन भूतानच्या एकूण क्षेत्रफळाच्या 12 टक्के हिस्स्यावर दावा सांगत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सामर्थ्य वाढण्यासोबत चीनची अरेरावी वाढत चालली आहे.









