मॅडम नीला गर्दीच्या ठिकाणी जायचे म्हटले की बेचैन होते. तिथे पोचण्यापूर्वीच तिला अस्वस्थ वाटू लागते. तिला समजावून सांगितले, पण ती म्हणते, ‘मनात खूप विचार येतात. बापरे, तिथे जाणे नकोच. तिथे गेल्यावर जीव कासावीस होणार, गुदमरल्यासारखे होणार, हातापायात गोळे येणार, नकोच त्यापेक्षा. घरातच बसूया.’ तिथे जायचे नाही म्हटल्यावर ती एकदम रिलॅक्स होते. जादूची कांडी फिरवावी तशी क्षणार्धात भीती गायब होते. जोपर्यंत बाहेर जाण्याचा विषय निघत नाही तोपर्यंत मनात चलबिचल होत नाही, पुन्हा जायचे म्हटले की जी अस्वस्थता सुरू. ‘कळतंय पण वळत नाही’ अशीच काहीतरी तिची अवस्था झाली आहे.
नीलाच्या आईने वर्णन केलेली मुलीची अवस्था अगदी टिपिकल होती. अर्थात प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्या केसमधील तपशिलात काही फरकही दिसू शकतात किंवा काही वेगळय़ा छटाही पहायला मिळतात परंतु प्राथमिक भीती आणि भीतीचे थर वाढत जातात आणि भयप्रद गोष्टींची व्याप्ती वाढत जाते. नंतर नुसत्या विचार व कल्पनेनेही भीती वाटू लागते. कळते पण वळत नाही अशी फोबियाग्रस्त व्यक्तीची स्थिती असते. मागच्या एका लेखात उल्लेख केल्याप्रमाणे असे होते कारण आपल्या डोळय़ासमोर जे येते त्याची जागृत मनाला जाणीव होण्यासाठी 350 मिनी सेकंदाचा कालावधी लागतो. मात्र डोळय़ातील रेटिनामध्ये तयार झालेली लहर मेंदूतील भीती निर्माण करणाऱया भागापर्यंत पोचण्यासाठी अवघ्या 50 मिनी सेकंदाचा कालावधी लागतो. म्हणजेच जागृत मनाला अर्थात बुद्धीला जाणीव व्हायच्या आतच पन्नास मिनी सेकंदापर्यंत ती लहर आपल्या भावनिक मेंदूपर्यंत पोचलेली असते. त्यामुळे आपला भावनिक मेंदू त्वरित प्रतिक्रिया करतो म्हणूनच बऱयाचदा कळायच्या आतच वळलेले असते अशी काहीशी स्थिती होते.
आपल्या मेंदूतील लिंबिक सिस्टिम नावाचा भाग भावनांशी निगडित असतो त्यामध्ये amaygdla नावाचा खूप महत्त्वाचा अवयव आहे. जो कोणताही धोका जाणवला की लगेच प्रतिक्रिया करतो. उदाहरणार्थ, समजा आपण रस्त्यावरून चालत आहोत अचानक कुत्रा भुंकत अंगावर आला धोका आहे हे कळताक्षणी हा भाग प्रतिक्रिया करतो. शरीरातील अड्रिनलीनसारख्या अंतस्त्रावी ग्रंथी काही रसायने शरीरात सोडतात. शरीरात अनेक क्रिया घडतात ज्यामुळे आपण धोक्मयाला तोंड द्यायला किंवा पळायला सज्ज होतो हे सारे काही सेकंदात घडते. खरंतर, निसर्गाने ही व्यवस्था स्वसंरक्षणासाठी केली आहे परंतु हाच amygdala अधिक सक्रिय झाला तर? मग मात्र तो छोटय़ा छोटय़ा गोष्टींना प्रतिक्रिया करू लागतो. amygdalaची सक्रियता केवळ विचार करून बदलता येत नाही ती जर कमी करायची असेल तर त्याला समजेल अशा भाषेत त्याच्याशी संवाद साधायला हवा. amygdala सतत शरीराशी जोडलेला असतो आणि शरीराच्या संवेदनांना तो प्रतिक्रिया करत असतो. म्हणजेच त्याला फक्त संवेदनांची भाषा समजते. भीती कमी करण्यासाठी amaygdalaची छोटय़ा छोटय़ा गोष्टींना होणारी तीव्र प्रतिक्रिया टाळायची असेल तर ‘बॉडी स्कॅन’ हा माईंड फुलनेस चिकित्सेतील मेंदूचा व्यायाम महत्त्वाचा ठरतो. परंतु त्यापूर्वी माईंड फुलनेस चिकित्सेतील नैसर्गिक श्वसनासोबत होणारी छाती पोटाची हालचाल जाणणे, श्वास जाणणे, शांत बसून मनात येणारे विचार, भावना यांना चांगले अथवा वाईट असे लेबलिंग न करता त्याकडे साक्षीभावाने पाहणे याचा सरावही महत्त्वाचा आहे. कारण आपला amygdala संवेदना सतत जाणत असतोच पण त्या अनेकदा आपल्या जागृत मनाला जाणवत नसतात. ‘श्वासाची हालचाल जाणणे आणि साक्षी ध्यान’ या व्यायामाच्या नियमित सरावाने या संवेदना ही आपल्याला लवकर जाणवू लागतात.
फोबियायामध्ये बॉडी स्कॅन हे माईंड फुलनेस चिकित्सेतील तंत्र अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी खुर्चीत बसायचे किंवा जमिनीवरती मांडी घालून बसायचे आणि पुढील दहा मिनिटे मी शरीराची कोणतीही हालचाल करणार नाही. शरीर स्थिर ठेवणार आहे असे ठरवायचे. आता डोक्मयापासून पायापर्यंत शरीराची मनाने सफर करायची. कुठे वस्त्राचा स्पर्श, जमिनीचा स्पर्श जाणवतो आहे का किंवा कोणत्या अन्य संवेदना निर्माण होत आहेत का हे जाणायचे. शरीराच्या संवेदना जाणायच्या म्हणजे जणू काही मनाने शरीराच्या पेशींशी संवाद साधायचा. तिथे काय काय चालले आहे हे जाणायचे. कुठे दुखते आहे का, धडधडते आहे का, खाज सुटते आहे का, जळजळते आहे का हे जाणायचे. तसे होत असेल तर ती स्थिती तशीच किती वेळ राहते आहे? ती तशीच राहते आहे की बदलते आहे? हे (हे चांगले आहे किंवा वाईट आहे असे लेबलिंग न करता) शांतपणे जाणत राहायचे. जेव्हा आपण प्रतिक्रिया करतो तेव्हा amygdala ची सक्रियता वाढवतो. याउलट ज्यावेळी आपण कोणतीही प्रतिक्रिया न करता केवळ संवेदना जाणत राहतो त्यावेळी अशा स्थितीत (मेंदूचे परीक्षण केले असता) amaygdala ची सक्रियता कमी झालेली आढळते.
फोबियामध्ये याचा खूप उपयोग होतो. भीतीमुळे शरीरामध्ये जी लक्षणे व संवेदना निर्माण होतात उदाहरणार्थ धडधड जाणवते, हातापायाला कंप सुटतो, पोटात गोळा येतो वा अन्य काही नाव न देता येणाऱया संवेदना जाणवतात आणि भीती तीव्र होते त्या संवेदनांना बॉडी स्कॅनच्या नियमित सरावाने सामोरे जाणे जमू लागते. प्रतिक्रिया न केल्याने भीतीची तीव्रता कमी होते. शरीरात कोणतीही युद्धस्थिती नाही हा मेसेज मेंदूपर्यंत पोचतो आणि शरीर मन शांतता स्थितीमध्ये येते.
फोबियामध्ये माईंड फुलनेस चिकित्सेतील ‘व्हिज्युअलायझेशन’ अर्थात ‘कल्पना दर्शन’ ध्यानाचाही खूप उपयोग होतो. कल्पना दर्शन ध्यान म्हणजे त्या प्रसंगाची, दृश्याची किंवा ज्या गोष्टीची भीती वाटते ती कल्पना करून पहायची, अनुभवायची. कल्पनेने आवाज ऐकायचा, स्पर्शाची कल्पना करायची.पहा, आपण डोळे बंद केले आणि लिंबू अथवा चिंचेचे ध्यान केले तर तोंडाला पाणी सुटते. फोबियामध्येही एखाद्या गोष्टीची किंवा ज्या गोष्टीची भीती असते. तिच्या केवळ विचाराने वा कल्पनेनेच शरीरामध्ये युद्धस्थिती निर्माण होत असते. ज्या गोष्टीची भीती आहे त्या गोष्टीला आधी कल्पना करून पाहणे, हळूहळू त्याचा स्पर्श अनुभवत, तिथे जात आहोत अशी कल्पना करणे हे या तंत्रामध्ये टप्प्याटप्प्याने शिकवले जाते. जर शरीरात त्यावेळी काही संवेदना निर्माण झाल्या तर अगोदर करत असलेल्या बॉडी स्कॅन या तंत्राच्या नियमित सरावाने त्याला सामोरे जाणेही रुग्णाला सहज जमू लागते. कल्पनेने टप्प्याटप्प्याने त्या फोबिक वस्तूच्या जवळ जाणे, ते वातावरण अनुभवणे हे कल्पनादृश्याच्या माध्यमातून करता येते. नंतर प्रत्यक्षपणे त्या गोष्टीला सामोरे जाताना त्याचा खूप उपयोग होतो. अर्थात प्रत्येक फोबियामध्ये रुग्णाची स्थिती पाहून विविध उपचारांची दिशा ठरवावी लागते. परंतु योग्य उपचाराने फोबिया निश्चित बरा होतो.
काही वेळा दु:ख कमी करून मन शांत करणारी औषधे देणे, समुपदेशन, बिहेवियर उपचार पद्धती, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरेपी या उपचार पद्धतींच्या माध्यमातून फोबिया निश्चितच दूर करता येतो. परंतु रुग्णाची हेटाळणी न करता त्याला दिलासा देणे, समजून घेत योग्य उपचार घ्यायला प्रवृत्त करणे हे जरी आपण सजगतेने केले तरी फोबियाग्रस्त व्यक्तीसाठी अनेक गोष्टी सोप्या होतील हे मात्र खरे!!
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583








