ऑनलाईन टीम / भिवंडी :
भिवंडी येथील पटेल कंपाऊंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ठाकरे सरकार कडून पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे, अशी घोषणा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
सोमवारी पहाटे झालेल्या या दुर्घटनेत आत्तापर्यंत दहा जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 30 ते 40 जण यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जावून सुरू असलेल्या मदत कार्याची पाहणी केली तसेचजखमींवर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तेथे जाऊन त्यांची विचारपूस केली असून जखमींचा उपचार मोफत केले जाणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भिवंडी येथील इमारत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.