गोवा सुरक्षा मंचची टीका
पणजी /प्रतिनिधी
भाषा विषयावर आज भाजपवाल्यांना बोलण्याचा अधिकार उरलेला नाही. सगळी बजबजपुरी माजवली आहे. सुभाष वेलिंगकर यांना भाषा सुधारण्याचा सल्ला देणाऱयानी आधी स्वतःला आवर घालावा. भाजपाला लोकांचा पाठींबा आहे, असे म्हणणाऱयांनी हे सरकार मागील दाराने सत्तेवर आले आहे, हे विसरू नये, तसेच काँग्रेस फोडून आम्हाला पाठींबा असल्याचे टिवटिवणे वाजवू नये अशी टीका गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
2012 च्या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, सदानंद तानावडे, विनय तेंडुलकर यांच्या भाषणांचे व्हिडिओ असतील तर नीट पाहून, ऐकून अभ्यास करून बोलले तर भरे होली, असा टोमणाही फळदेसाई यांनी लगावला. इंग्रजी शाळांचे अनूदान बंद करू, डायसिसनचे अनुदान बंद करू अशी दिलेली आश्वासने सत्ता येताच हवेत विरून गेली, हे आपण हेतुपुरस्सर विसरता, यांची आठवण फळदेसाई यांनी करून दिली. या डायोसिसनचे लाड पुरवत परकीय भाषेला मराठी व कोकणीच्या छाताडावर बसवणाऱयांना काय म्हणावे? असा सवाल फळदेसाई यांनी यावेळी विचारला.
प्रा. माधवराव कामत, व भास्कर नायक यांनी केलेल्या शिफारशी अंमलात न आणता त्या बासनात गुंडाळून ठेवलेल्यानी या विषयावर बोलूच नये. तुम्हाला आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली, हेच आमच्या आंदोलनाचे यश आहे. हे आंदोलन आम्ही अजून तीव्र करणार असल्याचे फळदेसाई म्हणाले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, जागतिक नियमावली पायदळी तुडवून चर्चची दलाली करणाऱया लोकांचे सत्कार करण्याची अपेक्षा आमच्या कडून कधीच करु नका, असेही फळदेसाई म्हणाले. गोवा सरकारच्या या अनास्थेचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत मराठी शाळा धडाधड बंद पडत आहेत, 17 लाख रुपयांचे विशेष अनुदान अजून मिळाले नाही, त्याची व्यवस्था करण्याची सरकारची जबाबदारी आहे, नेमकी तेच सरकार विसरली असल्याचे फळदेसाई म्हणाले. प्रति विद्यार्थी 400 रूपयांचे अनुदान सरकार ने बंद केले आहे, ते शाळांना आधी द्यायला सुरू करा,असे आवाहनही फळदेसाई यांनी केले.
प्रा.माधव कामत व भास्कर नायक यांच्या शिफारशी तात्काळ अंमलबजावणी करा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून मराठी व कोकणी शाळांना जिवदान द्या. या सर्व गोष्टी तात्काळ करा, मग वेलिंगकरांवर टिका करा, असे सांगण्यास फळदेसाई विसरले नाहीत.









