ऑनलाईन टीम/तरुण भारत
रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे. अनेक भारतीय लोक युक्रेनमध्ये आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न नकरता आहे. यासाठी ऑपरेशन गंगा राबविण्यात येत आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत अनेक भारतीयांना देशात आणण्यात येत आहे. पण आद्यपही अनेक भारतीय युक्रेनमध्येच आहेत. यासंदर्भात रशियाने एक दावा केला आहे. युक्रेनमधल्या भारतीयांना युक्रेनच्या सुरक्षा दलांनी ओलिस ठेवलं असून, त्यांचा ढालीसारखा वापर करत असल्याचं ट्वीट भारतातल्या रशियन दूतावासानं केलं होतं. मात्र भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही केवळ अफवाच असल्याचं स्पष्ट केलं आहे.
भारतामधील रशियन दूतावासाने ट्वीट केलं होतं की, “ताज्या माहितीनुसार युक्रेनियन सुरक्षा दलाच्या जवानांनी भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं आहे. ते त्यांचा वापर ढालीप्रमाणे करत आहेत आणि त्यांना शक्य त्या सर्व पद्धतीने युक्रेन सोडून रशियाला जाण्यामध्ये अडथळे निर्माण करतायत. या प्रकरणामध्ये मुलांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी किव्हवर आहे.”
मात्र, भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं याबद्दल कोणतीही माहिती आपल्या हाती लागली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आपल्या निवेदनात मंत्रालयाने म्हटलं आहे की, युक्रेनमधला भारतीय दूतावास युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहे. युक्रेनच्या प्रशासनाच्या सहकार्याने काल अनेक भारतीयांनी खारकीव्ह सोडलं आहे. आम्हाला कोणत्याही विद्यार्थ्याला, नागरिकांना ओलिस ठेवल्यासंदर्भातली कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. खारकीव्ह आणि आजूबाजूच्या परिसरातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष रेल्वेची सोय व्हावी यासाठी आम्ही युक्रेन प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.









