कोरोना विषाणूचा संसर्ग : विदेश मंत्रालयाने उचलली पावले : चीनमध्ये आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, बीजिंग
चीनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेला भारताने वेग दिला आहे. बीजिंगमधील भारतीय दूतावास या प्रकरणी चीन सरकार, अधिकारी आणि नागरिकांच्या संपर्कात असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी मंगळवारी दिली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत कोरोना विषाणूने संक्रमित झाल्याच्या संशयामुळे तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केरळच्या आरोग्य विभागानुसार चीनमधून अलिकडेच परतलेल्या 436 जणांवर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे. चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये 1300 नवे रुग्ण समोर आले आहेत. हुबेई प्रांतात 100 जणांना जीव गमवावा लागला असून जगभरात आतापर्यंत 4515 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 4409 रुग्ण चीनमधील आहेत.
या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या वुहान शहरात अडकून पडलेल्या भारतीयांची योग्य संख्या विदेश मंत्रालयाला समजू शकलेली नाही. पण या भारतीयांना तेथून बाहेर काढण्यासाठी एअर इंडियाचे जंबो जेट सज्ज आहे.
म्यानमार सीमेवर स्क्रीनिंग उपकरण
म्यानमारने भारताच्या सीमेवर कोरोना विषाणूचे स्क्रीनिंग उपकरण बसविले आहे. भारतीय नागरिकांच्या स्क्रीनिंगसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मणिपूरच्या मोरेहमार्गे म्यानमारमध्ये प्रवेश करता येतो. मोरेह भारत आणि म्यानमार यांच्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.
300 विद्यार्थी संकटात
वुहानमध्ये 600 हून अधिक भारतीय शिक्षण घेत आहेत. पण नववर्षाच्या रजनेनिमित्त त्यातील बहुतांश जण भारतात परतले आहेत. 250 ते 300 विद्यार्थी अद्याप वुहानमध्ये असण्याची शक्यता आहे. चीनमध्ये जाणारे सर्वजण दूतावासात नोंदणी करत नसल्याने अचूक संख्या समजणे अवघड आहे. प्रत्येकाला फोन करून माहिती घेतली जात असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले. तर अमेरिकेने स्वतःच्या नागरिकांना एअरलिफ्ट केले आहे.
जैविक अस्त्रांशी संबंध?
वुहानच्या प्रयोगशाळेत जैविक अस्त्रांच्या सुरू असलेल्या गुप्त संशोधनातूनच कोरोना विषाणू निर्माण झाल्याचा दावा इस्रायलचे माजी सैन्य गुप्तचर अधिकारी डॅनी शोहम यांनी केला आहे. वुहान इन्स्टीटय़ूट ऑफ वायरोलॉजी ही चीनमधील अत्याधुनिक विषाणू संशोधन संस्था आहे.
1500 रुपयांना पाण्याची बॉटल
वुहानमध्ये लोकांना घरातून बाहेर पडण्याची अनुमती नाही. चीनमध्ये केवळ आठवडय़ापुरती धान्याचा साठा करता येतो. कोरोना विषाणूच्या संकटादरम्यान धान्य संपणे साहजिक ठरले आहे. खाद्यपदार्थांचे दर दुप्पटीपेक्षा अधिक झाले आहेत. 3 युआनला मिळणारी पाण्याची बॉटल आता 150 युआन म्हणजेच सुमारे 1500 रुपयांना मिळत आहे.









