वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हॉकी पंच व्यवस्थापक वीरेंद्र सिंगचे वयाच्या 47 व्या वर्षी कोरोनामुळे उत्तरप्रदेशमधील मिरत येथे निधन झाले. हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱयांनी वीरेंद्र सिंग यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
हॉकी इंडियाच्या पंच नियुक्त समितीमध्ये वीरेंद्र सिंग हे व्यवस्थापकपद सांभाळत होते. देशात होत असलेल्या राष्ट्रीय आणि अखिल भारतीय हॉकी स्पर्धांमध्ये पंचांची नियुक्ती करण्याची जबाबदारी वीरेंद्र सिंग यांच्यावर हॉकी इंडियाने सोपविली होती. नुकत्याच झालेल्या 56 व्या अखिल भारतीय वीर सिंग जू देव स्मृती हॉकी स्पर्धा तसेच पाचव्या अखिल भारतीय राजमाता विजया राजे सिंदिया स्मृती महिलांच्या हॉकी स्पर्धेत वीरेंद्र सिंग यांची पंच व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली होती. 2019 साली बेंगळूरमध्ये झालेल्या अखिल भारतीय बेंगळूर चषक निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेत त्याचप्रमाणे 2019 साली हरिद्वार येथे झालेल्या अखिल भारतीय स्वामी श्रद्धानंद हॉकी स्पर्धेत वीरेंद्र सिंग यांनी पंच व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी केली होती. गेल्या काही दिवसापूर्वी वीरेंद्र सिंग यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचे अखेर सोमवारी निधन झाले.








