वाघांच्या गणनेसंबंधी सर्वेक्षण : 26 हजारांपेक्षा अधिक ठिकाणांहून 3.5 कोटी छायाचित्रे मिळविली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील वाघांची संख्या निर्धारित लक्ष्याच्या 4 वर्षांपूर्वीच दुप्पट झाली आहे. लक्ष्यपूर्तीची पुष्टी मिळविण्यासाठी द ऑल इंडिया टायगर एस्टीमेशनने 1 लाख 21 हजार 337 चौरस किलोमीटर क्षेत्राचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात 26 हजार 760 ठिकाणी विविध भागांमध्ये कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेऱयांच्या माध्यमातून 3.5 कोटींपेक्षा अधिक छायाचित्रे प्राप्त करण्यात आली आहेत. यात 76 हजार 651 छायाचित्रे वाघाची तर 51 हजार 777 छायाचित्रे बिबटय़ांची आहेत. वाघांसंबंधी करण्यात आलेले हे जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण ठरले आहे. तसेच याची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
2018 मध्ये हे सर्वेक्षण पार पडले आहे. मागील वर्षी याचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले असले तरीही जागतिक विक्रमाची घोषणा आता करण्यात आली आहे. या सर्वेक्षणानुसार देशातील वाघांची संख्या 2,967 इतकी आहे. 2006 मध्ये हा आकडा 1,411 होता. भारताने सुमारे 9 वर्षांपूर्वी सेंट पीटर्सबर्गमध्ये 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य जाहीर केले होते.
संकल्पसिद्धीचे उदाहरण
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. वन्यजीव सर्वेक्षणासाठी प्रत्यक्षात हा एक महान क्षण आणि आत्मनिर्भर भारताचे सर्वोत्तम उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने 4 वर्षे शिल्लक असतानाच वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. जगातील वाघांच्या एकूण संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात असल्याचे जावडेकर म्हणाले.









