वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी तसेच त्यानंतर होणाऱया पाच कसोटीच्या मालिकेसाठी इंग्लंडला प्रयाण करणार आहे. या दौऱयात सामील असणाऱया सर्व खेळाडू व स्टाफला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. आता त्यांना यूके आरोग्य खात्यातर्फे दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या घडामोडीची माहिती असणाऱया सूत्राने सांगितले की, भारतीय खेळाडूंना दुसरा डोस देण्याची व्यवस्था इंग्लंड आरोग्य खात्याच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे. ‘भारतात 18 वर्षांवरील व्यक्तीसाठी लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर भारतीय संघाने पहिला डोस घेतला आहे. नियमाप्रमाणे विशिष्ट कालावधी झाल्यानंतर दुसरा डोस देण्यात येणार असल्याने भारतीय खेळाडूंना इंग्लंडच्या आरोग्य विभागातर्फे तो देण्याची व्यवस्था केली जाईल,’ असे या सूत्राने स्पष्ट केले.
इंग्लंड दौऱयावर जाण्याआधी बीसीसीआयने शिस्तबद्ध कार्यक्रम योजला असून पहिला डोस दिल्यानंतर सर्व खेळाडूंची तीनदा आरटी-पीसीआर चाचणीही घेतली जाणार आहे. बुधवारी सर्व खेळाडू मुंबईत एकत्र जमणार आहेत. दहा दिवसांचे क्वारन्टाईन पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडमध्ये त्यांना पुन्हा एकदा दहा दिवसांसाठी क्वारन्टाईन व्हावे लागणार आहे. इंग्लंडमध्ये मात्र त्यांचे हार्ड क्वारन्टाईन असल्याने हॉटेल रूममधून त्यांना बाहेर पडता येणार नाही. ते पूर्ण झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीच्या तयारीसाठी त्यांना सराव करता येणार आहे. भारताची अंतिम लढत न्यूझीलंडविरुद्ध साऊदम्प्टन येथे होणार आहे.









