वृत्त संस्था/ डाँगेई (कोरिया)
येथे 5 ते 12 डिसेंबर दरम्यान होणाऱया आशियाई चॅम्पियन्स करंडक महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना थायलंडविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाने जोरदार पूर्वतयारी केली आहे.
या स्पर्धेसाठी भारत, चीन, यजमान कोरिया, जपान, थायलंड आणि मलेशिया हे देश सहभागी होत आहेत. या सर्व संघांचा एकाच गटात समावेश आहे. भारताचा सलामीचा सामना 5 डिसेंबरला थायलंडविरुद्ध होईल.
भारताचा दुसरा सामना 6 डिसेंबरला मलेशियाविरुद्ध, तिसरा सामना यजमान आणि विद्यमान विजेतया कोरियाविरुद्ध 8 डिसेंबरला होणार आहे. कोरिया-भारत यांच्यात यापूर्वी झालेल्या सामन्यात कोरियाने भारतावर 1-0 असा निसटता विजय मिळविला होता. गेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक महिलांच्या हॉकी स्पर्धेत मलेशियाला चौथे स्थान मिळाले होते. कोरियामध्ये होणाऱया या स्पर्धेत भारताचा चीनविरुद्ध सामना 9 डिसेंबरला तर जपानविरुद्ध सामना 11 डिसेंबरला होणार आहे. या स्पर्धेत आघाडीच्या दोन संघामध्ये अंतिम लढत 12 डिसेंबरला खेळविली जाणार आहे.









