वृत्तसंस्था/ बिस्बेन
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर आहे. शनिवारी येथे झालेल्या सरावाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 36 धावांनी पराभव केला. या दौऱयामध्ये भारतीय महिला संघ एकमेव दिवस-रात्रीचा कसोटी सामना त्याचप्रमाणे वनडे मालिका खेळणार आहे.
या सरावाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 9 बाद 278 धावा जमविल्या. सलामीच्या रॅचेल हेन्सने 65, लेनिंगने 59, बेथमुनीने 59 धावा झळकविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने 50 षटकांत 7 बाद 242 धावापर्यंत मजल मारली. भारतीय संघातील पुजा वस्त्रsकरने सर्वाधिक म्हणजे 57 धावा जमविल्या.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू इलेसी पेरीने 38 धावांत 2 तर कँपबेलने 38 धावांत 3 गडी बाद केले. सलामीच्या स्मृती मंदानाने 14, मिथाली राजने 1, शेफाली वर्माने 27 तसेच रिचा घोषने 11 धावा जमविल्या. भारतीय संघातील भाटियाने 41 धावांचे योगदान दिले. 21 वर्षीय भाटियाने 41 धावा जमविल्या. दिप्ती शर्माने नाबाद 49 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात भारताच्या झुलन गोस्वामीने 36 धावांत 2 गडी बाद केले. उभय संघातील पहिला वनडे सामना मंगळवारी खेळविला जाणार आहे.









