जानेवारीच्या 18 तारखेला बिरजू महाराजांच्या निधनाची बातमी आली. कथक जगलेले हे व्यक्तिमत्त्व जाता जातासुद्धा जगाला भारताकडे असलेल्या कला आणि प्रतिभेची जाणीव करून देऊन गेले. भारतीय कथक नृत्य क्षेत्रामध्ये ‘महाराजजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया बिरजू महाराजांना कथक नृत्याचा आदर्श मानले गेले आहे. वयाच्या 7 व्या वर्षापासून ते कथक करत होते. त्यांच्या जाण्यामुळे पुन्हा एकदा भारतातील नृत्य कलांकडे लक्ष गेले. अशीच अजून एक व्यक्ती ज्यांनी भारतीय संगीत विश्वावर राज्य केले त्या लतादीदीसुद्धा आपल्याला गेल्या रविवारी सोडून गेल्या. पूर्ण भारत देश कोणाच्या जाण्याने एवढा हादरून जाईल, हळहळेल हे खूप क्वचित बघायला मिळते. या दिग्गज व्यक्तिमत्त्वांमुळेच भारताच्या सर्जनशील भविष्याबद्दल आपण आशावादी आहोत.
आधुनिकीकरणाच्या काळात भारतीय पारंपरिक कलांकडे दुर्लक्ष होत आहे. काळाप्रमाणे नवनवीन कला आपण आपल्या संस्कृतीमध्ये सामावून घेतल्या आहेत. या सर्व विविध कला अनुभवल्या की मानवी बुद्धीच्या कौशल्याचे कौतुक वाटते.
भारताने कलाक्षेत्राला सांस्कृतिक आणि सर्जनशीलतेची प्रतीक असलेली अनेक नृत्ये दिली आहेत. कला, नृत्य आणि सर्जनशीलता ही केवळ आपल्या आजूबाजूला नसून, हिंदू धर्मातील देवदेवतांमध्येदेखील आहे. हिंदू देवता महादेव यांचे अनेक अवतार आहेत. त्यातील एक अवतार म्हणजे नटराज अवतार. नट म्हणजे अभिनय आणि राज म्हणजे राजा. महादेवाच्या या अवताराला ‘नृत्याचा राजा’ म्हटले गेले आहे. हा अवतार 2 प्रकारची नृत्ये सादर करताना आपल्याला दिसतो. एक म्हणजे ‘लास्य’ (नृत्याचा सौम्य प्रकार) आणि ‘तांडव’ (नृत्याचा रौद्र प्रकार). अशा चैतन्याने भरलेल्या देव-देवतांचे वंदन आपल्या भारत देशात खूप पूर्वीपासून केले जाते. याचाच अर्थ असा की भारत देश हा एकेकाळी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्राला जपणारा, त्यातील आनंद जोपासणारा देश होता. बदलत्या जगाच्या शर्यतीत ही भावना जरी लपली गेली असली, तरी प्रत्येक भारतीयामध्ये ते गुण आजही आढळतील. भारतातील नृत्य कला ही दोन श्रेणीत विभागली गेली आहे. एक म्हणजे लोकनृत्य व दुसरे म्हणजे शास्त्रीय नृत्य. त्याचेच उदाहरण म्हणजे भारतात पूर्वीपासून सादर केले गेलेले हे दुर्मीळ लोकनृत्य व शास्त्रीय नृत्याचे प्रकार. त्यातील काही नृत्यप्रकारांची ही छोटीशी ओळख !

1. लावणी ः मराठी मातीतून जन्मलेली ही एक स्त्रीभिमुख कला आहे. लावणी हा शब्द लावण्य या शब्दावरून घेतला आहे. लावण्य म्हणजेच सौंदर्य. लावणी ढोलकीच्या तालावर आपल्याला ताल धरायला लावते. ही कला कथा आणि नृत्य यांचे मिश्रण आहे ज्यामध्ये धर्म, राजकारण, समाज आणि प्रेम अशा विविध विषयांवर आधारित नृत्य सादर केले जाते. यामध्ये वाजवली जाणारी ढोलकी आणि घुंगराचा आवाज आजही एखाद्या माणसाला नाचायला, डोलायला भाग पाडतो!
2. मोहिनीअट्टम ः भारतीय पुराणाप्रमाणे विष्णू देवाचा स्त्री अवतार मोहिनी ही एक अतिशय सुंदर स्त्री होती. केरळमधील सर्वात लोकप्रिय असा हा नृत्याचा प्रकार आहे. या नृत्याची खासियत अशी, की यामधील गाणे किंवा कथा या मुख्य महिला नर्तक सादर करतात. त्याला साथ म्हणून मृदंग, बासरी, वीणा, इडक्कासारख्या वाद्यांची साथ असते. कधी काळी काही कारणास्तव बंद पडलेली ही नृत्य कला आता पुनरुज्जीवित झाली आहे.
3. सत्तरीया ः आसाममधील महापुरुष संकर्देव यांनी ही नृत्य कला पहिल्यांदा लोकांसमोर प्रस्तुत केली होती. तेथील वैष्णव मठामध्ये या कलेचे जतन केले गेले ज्यामुळे ती परंपरा आजही शाबूत आहे. पौराणिक कथा नृत्याद्वारे मांडण्याची ही कला खरंच खूप अद्भुत आहे. हे नृत्य पुरुष आणि स्त्रिया दोघेही सादर करू शकतात.
4. रौफ ः या नृत्याचा उगम भारताच्या उत्तर भागामधून झाला आहे. जम्मू काश्मीरमधील हे प्रसिद्ध लोकनृत्य वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी केले जात होते. हा साधा व आनंदी नाच काश्मीरच्या मुसलमान समाजाची जगातील नृत्यक्षेत्राला दिलेली देणगी आहे. स्त्रिया काश्मिरी कशिदा काढलेला सलवार कमीज घालून काव्यात्मक संगीतावर नाचतात. त्यांच्या पोशाखाची खासियत म्हणजे त्यांचा कसाब किंवा डायझ नावाचा डोक्मयाचा स्कार्फ.
5. गिद्धा ः पंजाबमधील भांगडा हा तर जगप्रसिद्ध नृत्याचा प्रकार आहे. पण त्याचबरोबर गिद्धा नावाचा स्त्रियांचा हा नाचदेखील पंजाबमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तो भांगडासारखाच उत्साही नाच आहे आणि साधारण एका वर्तुळात सादर केला जातो. हा नाच करायला स्त्रियांमध्ये डौलदार अदा आणि लवचिक शरीराची गरज असते. याला कोणत्याही वाद्यांची गरज नसते. हा नाच स्त्रिया एक गोलाकार करून, स्वतः वाजवल्या जाणाऱया टाळय़ांच्या तालावर सादर करतात. या नाचामध्ये स्त्रिया रंगीत सलवार कमीज व दागिने घालून मिरवताना दिसतात.

कुठलीही कला ही अद्भुत आणि अद्वितीय असते. कारण त्याचा उगम हा माणसाच्या मनामधून झालेला असतो. त्यामुळे, या सर्व कला, माणसाच्या मनामधील कौशल्याचे प्रतिबिंब आहे असे म्हणायला हरकत नाही आणि अशावेळेला भारत देशाकडे जर इतका सर्जनशीलतेचा साठा असेल तर ते अभिमानास्पद आहे. पण भाषा ही सार्वत्रिक नसल्यामुळे या सर्व गोष्टींना हवी तेवढी ओळख मिळत नाही. आपणच जर आपल्या संस्कृतीचा अभिमानाने प्रसार नाही केला तर इतर संस्कृती त्याचा स्वीकार कसा करतील? ज्ये÷ांना या कलेबद्दल, इतिहासाबद्दल जरी माहिती असली तरी येणाऱया पिढीला या सर्व गोष्टींची जाणीव नसते. त्यांना त्यांच्या भव्य वारसांची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्याबाबतीत कुतूहल निर्माण केले पाहिजे. कित्येक वर्षांचा वारसा पुढे चालू ठेवणाऱया कलाकारांच्या मेहनतीची जाणीव ठेवली
पाहिजे. आज ते लोक नफ्याचा विचार न करता कलेचा मान ठेवून त्याचा प्रसार करतात म्हणून आपल्या सर्जनशीलतेचा वारसा टिकून आहे आणि त्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात जागण्याची गरज आहे.
-श्राव्या माधव कुलकर्णी








