प्रतिनिधी/ वास्को
गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘आयसीजीएस सजग’ या गस्ती जहाजाचे शनिवारी ऑनलाईन माध्यमाव्दारे केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हस्ते तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल करून घेण्यात आले. गोवा शिपयार्ड तटरक्षक दलासाठी बांधीत असलेल्या गस्ती जहाजांच्या मालिकेतील हे तिसरे जहाज आहे. अन्य दोन जहाजांचे कामही सध्या अंतीम टप्प्यात आलेले आहे.
‘आयसीजीएस सजग’ या गस्ती जहाजाच्या तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील करण्याच्या क्षणानिमित्त गोवा शिपयार्डमध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पेद्रीय स्तरावरील मान्यवरांनी या कार्यक्रमात ऑनलाईन माध्यमातून सहभाग दर्शवला. केंद्रीय सुरक्षा सचिव डॉ. अजय कुमार, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक कृष्णस्वामी नटराजन, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. बी. नागपाल, भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी, केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी यात सहभागी झाले होते.
‘आयसीजीएस सजग’ हे जहाज 105 मीटर लांबीचे असून या गस्ती जहाजाचा कायम तळ पोरबंदर येथे असणार आहे. सदर जहाज अत्याधुनिक असून सागरी गस्त, बचाव कार्य व सागरी सुरक्षेसंबंधीत सर्व प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जाण्याची या जहाजाची क्षमता आहे. ताशी 26 सागरी मैल इतकी या जहाजाची गती असेल. सध्या भारतीय तटरक्षक दलाकडे 157 गस्ती जहाजे तसेच 62 हवाई जहाजांचा ताफा आहे. शिवाय भारतातील विविध शिपयार्डमध्ये गस्ती जहाजांची बांधणी करण्यात येत आहे. तसेच हवाई 16 जहाजांचीही बांधणी देशात करण्यात येत आहे. आयसीजीएस सजगमुळे तटरक्षक दलाच्या कार्यक्षमतेत अधिकच भर पडणार आहे. या जहाजाचे नेतृत्व दलाचे उपमहानिरीक्षक संजय नेगी करणार असून 12 अधिकाऱयांसह 99 खलाशी या जहाजावर तैनात असतील.









