वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनच्या कार्यकक्षेतील समुद्रात भारताचे 39 खलाशी गेल्या तीन महिन्यांपासून अडकलेले असून त्यांच्या सुटकेसाठी भारताने आंतरराष्ट्रीय साहाय्याचे आवाहन केले आहे. या खलाशांचे जहाज चीनी नौदलाने अडविले आहे. अद्याप ते न सोडण्यात आल्याने खलाशांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
भरताची मालवाहू नौका जग आनंद चीनच्या जिंगतांग बंदरावर अडकलेली आहे. या नौकेला तेथून निघण्यासाठी चीनचा परवाना आवश्यक असून तो देण्यात आलेला नाही. तसेच नौकेवरील सागरी कर्मचारी वर्गाला वैद्यकीय सुविधा आणि ताजे अन्नही पुरवले जात नाही. त्यामुळे हा कर्मचारीवर्ग आता मानसिक तणावात असून सुटकेच्या अनुमतीची प्रतीक्षा करीत आहे, अशी माहिती परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
दुसऱया नौकेचीही हीच स्थिती
भारताची आणखी एक मालवाहू नौका अनास्ताशियाही कोफिदियन या चीनी बंदरावर 20 सप्टेंबरपासून अडकलेली आहे. या नौकेत 16 कर्मचारी आहेत. या दोन्ही नौकांमधील माल उतरवून घेतला गेलेला नाही. तसेच त्यांना पुढच्या प्रवासाची अनुमतीही देण्यात आलेली नाही. आता विश्वसमुदायाने या नौकांच्या सुटकेसाठी भारताला साहाय्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
चर्चा निष्फळ
गेल्या तीन महिन्यांमध्ये अनेकदा चीनच्या संबंधित अधिकाऱयांशी या संबंधी चर्चा करण्यात आली. नौका अडविण्याचे कारण विचारण्यात आले. मात्र, चीनची भूमिका असहकार्याची आहे. त्यामुळे संवाद करणेही अशक्य झाले आहे. भारत आपल्या नौका आणि त्यावरील कर्मचारी वर्ग यांच्या सुरक्षितेसंबंधात चिंतीत असून लवकरात लवकर त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय साहाय्य मिळाल्यास सुटका लवकर होऊ शकते, असे श्रीवास्तव यांनी प्रतिपादन केले.









