जपान वाढविणार भारतातील गुंतवणूक : पुढील 5 वर्षांत 3.2 लाख कोटींची गुंतवणूक पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर जपानच्या पंतप्रधानांनी घोषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी भारतात गुंतवणूक वाढविण्याची घोषणा केली आहे. जपान येत्या पाच वर्षांत भारतात 3.20 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जपानी कंपन्यांच्या या गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. जपान सध्या भारताला शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत करत आहे. याशिवाय जपानच्या मदतीने भारतात बुलेट टेन प्रकल्प मार्गी लावण्यासंबंधीही बोलणी झाली. दोन्ही देशांमध्ये सायबर सुरक्षेमध्ये सहकार्याबाबतही करार झाला आहे. दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत विविध द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा केली. त्यानंतर दोघांनी चौदाव्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला.
रशिया आणि युपेनदरम्यान सुरू असलेले युद्ध आणि चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान फुमियो किशिदा हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर दाखल झाले आहेत. जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर किशिदा यांचा हा पहिलाच भारतदौरा आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही पंतप्रधानांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या भेटीदरम्यान किशिदा आणि पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध आणि द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली.
जपानी कंपन्यांना सर्वतोपरी मदत : मोदी
प्रगती, समृद्धी आणि भागिदारी हे भारत-जपान संबंधांचे आधारस्तंभ आहेत. आम्ही भारतातील जपानी कंपन्यांना शक्मय ती सर्व मदत देण्यासाठी वचनबद्ध आहोत.
भारत-जपान द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होत असल्यामुळे आर्थिक भागिदारीमध्ये प्रगती झाली आहे. जपान भारतातील सर्वात मोठय़ा गुंतवणूकदारांपैकी एक आहे, असे भारत-जपान इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरवर सध्या ‘वन टीम-वन प्रोजेक्ट’ म्हणून भारत-जपान संयुक्तपणे काम करत आहेत. आमच्या आजच्या चर्चेने आमच्या परस्पर सहकार्याला नवीन उंचीवर नेण्याचा मार्ग मोकळा झाला. द्विपक्षीय मुद्यांव्यतिरिक्त आम्ही अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही विचार विनिमय केला. आम्ही संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आमचा समन्वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मोदींनी पुढे सांगितले.
युक्रेन-रशिया वादावर शांततापूर्ण तोडग्याची गरज : किशिदा
युक्रेन-रशिया युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिसून येत असल्यामुळे त्यावरही द्विपक्षीय बोलण्यांमध्ये चर्चा झाली. यावर दोघांनीही आपापले विचार व्यक्त केले. आम्हाला आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित शांततापूर्ण तोडगा हवा आहे. दोन्ही देशांनी मुक्त आणि मुक्त इंडो-पॅसिफिकसाठी प्रयत्न वाढवले पाहिजेत. भारतासह जपानही हे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत राहील. तसेच युक्रेनआणि त्याच्या शेजारी देशांना मदत पुरवेल, असे जपानचे पंतप्रधान किशिदा म्हणाले.
परिषदेत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. गेल्यावर्षी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आणि बहुपक्षीय भागिदारी पाहिली आणि भारत-जपान विशेष धोरण आणि भागिदारी आणखी मजबूत केली. भारत आणि जपानमध्ये विशेष धोरणात्मक आणि आंतरराष्ट्रीय भागिदारीच्या कार्यक्षेत्रात बहुआयामी सहकार्य आहे, असे बागची पुढे म्हणाले.
जपानचे पंतप्रधान भारताला 2.5 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याच्या निर्णयावर सहमतदेखील होऊ शकतात. जपानचे पंतप्रधान भारतात जपानी कंपनीच्या गुंतवणुकीबाबत स्वतंत्र घोषणा करू शकतात. शिंजो आबे हे जपानचे पंतप्रधान असताना 2014 मध्ये त्यांनी भारतातील गुंतवणुकीबाबत निर्णय घेतला होता. शिंजो आबे यांनी 3.5 ट्रिलियन येन गुंतवणुकीची घोषणा केली होती. आता किशिदा हे 5 ट्रिलियन गुंतवणुकीची घोषणा करू शकतात.
किशिदा यांचा पहिलाच भारत दौरा
2021 मध्ये जपानमध्ये झालेल्या निवडणुका जिंकल्यानंतर फुमियो किशिदा यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. 4 ऑक्टोबर 2021 रोजी जपानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. तसेच ते पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान किशिदा 300 अब्ज येनच्या कर्जावरही सहमती दर्शवू शकतात, असेही सांगण्यात येत आहे. यावेळी, दोन्ही बाजूंमधील कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत ऊर्जा सहकार्य दस्तऐवजावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.









