कुणीच शेजारी बदलू शकत नाही
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानातून अमेरिका आणि नाटो सैन्याच्या माघारीची कालमर्यादा आणि तालिबानचा वाढता प्रभाव पाहता भारताच्या अफगाण विषयक धोरणाबद्दल संशय आणि अनिश्चिततेची स्थिती आहे. याचदरम्यान तालिबानने भारतासंबंधी भूमिका मांडली आहे. आम्ही आमचा शेजारी देश भारत आणि क्षेत्रातील अन्य देशांसोबत शांततापूर्ण पद्धतीने राहू इच्छितो. कुठलाही देश स्वतःचा शेजारी बदलू शकत नसल्याचे तालिबानने म्हटले आहे.
पाकिस्तान आमचा शेजारी देश आहे. दोन्ही देशांचा संयुक्त इतिहास आणि मूल्ये आहेत. भारतही आमचा क्षेत्रीय देश आहेत. कुठलाच देश स्वतःचा शेजारी किंवा स्वतःच्या क्षेत्राला बदलू शकत नाही. शांततापूर्ण सह-अस्तित्वासोबत आम्हाला रहावे लागणार आहे. यातच आम्हा सर्वांचे हित असल्याचे विधान तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने केले आहे.
तालिबानच्या एका गटाशी संपर्क
सुहैल यांनी तालिबानला ‘राष्ट्रवादी इस्लामिक शक्ती’ ठरविले आहे. अफगाणिस्तानची भूमी विदेशी कब्जातून मुक्त करविणे आणि तेथे इस्लामिक सरकार स्थपान करणे हेच तालिबानचे लक्ष्य असल्याचे सुहैल म्हणाले. भारतीय अधिकाऱयांनी तालिबानच्या काही गटांशी संपर्क साधला असुन यात मुल्ला बरादर देखील सामील असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी अफगाणिस्तानच्या शांतता प्रक्रियेतून भारताला वगळण्यात आले होते.
भारताची मोठी गुंतवणूक मागील दोन दशकांमध्ये भारताने अफगाणिस्तानात 3 अब्ज डॉलर्सचे प्रकल्प उभारले आहेत. यामुळे आता भारताचा अफगाणिस्तानातील प्रभाव खूपच वाढला असल्याने पाकिस्तान बिथरू लागला आहे. पण आता भारतातील भविष्यातील भूमिका अनिश्चिततेच्या संकटात सापडली आहे. तालिबान अफगाणिस्तानात सर्वात शक्तिशाली गट म्हणून उदयास आल्यास भारताच्या भूमिकेवर मर्यादा येण्याची भीती आहे.









