रशियाचे प्रतिपादन : भारत-चीन तणावामुळे क्षेत्रीय अस्थैर्य वाढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे जगातील शक्तिशाली देशही चिंतेत आहेत. दोन्ही देशांचे सैन्य आधुनिक शस्त्रांसोबत सीमेवर तैनात आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वाढता तणाव पाहता रशियाने चिंता व्यक्त केली आहे. भारत-चीन सीमेवरील तणाव वाढल्यास पूर्ण युरेशिया क्षेत्रात अस्थैर्य वाढणार असल्याचे रशियाने म्हटले आहे. याचबरोबर रशियाने एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा लवकरात लवकर भारताला पुरविण्याचे आश्वासन दिले आहे.
रशियाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन रोमन बाबुश्किन यांनी भारत-चीन यांच्यातील ‘सकारात्मक संवाद’ अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. भारत आणि चीन शांघाय सहकार्य संघटना तसेच ब्रिक्सचे सदस्य असल्याने बहुराष्ट्रीय व्यासपीठांवर सहकार्याप्रकरणी सन्मानास्पद संवादच प्रमुख अस्त्र असते, असे त्यांनी सांगितले आहे.
जागतिक प्रभाव
जागतिक उलथापालथ आणि अनिश्चिततेदरम्यान भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढल्यास याचा प्रभाव युरेशिया क्षेत्राच्या स्थैर्यावर पडणार आहे. या अडथळय़ाचा गैरवापर अन्य सक्रीय शक्तींकडून स्वतःच्या भू-राजकीय हितासाठी केला जात असल्याचे आम्ही पाहिले आहे. दोन्ही आशियाई देशांना आणखीन अधिक सकारात्मक संवादासाठी प्रोत्साहित करणे महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.
रशियाशी दोन्ही देशांचे मैत्रीसंबंध
भारत आणि चीन दोन्ही देशांसोबत रशियाचे धोरणात्मक संबंध आहेत. भारत आणि चीन यांच्यातील तणावावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढला जाईल, असे आमचे मानणे आहे. दोन्ही जागतिक आणि जबाबदार शक्ती असून त्यांच्यात आर्थिक आणि संरक्षणाच्या बाबतीत अमाप शक्यता असल्याचे बाबुश्किन यांनी म्हटले आहे.
एस-400
भारताला लवकरात लवकर एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा देण्यासाठी दिवसरात्र कार्य केले जात आहे. भारताला एस-400 या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱया क्षेपणास्त्रांचा पुरवठा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत होऊ शकतो. दोन्ही देश परस्पर लॉजिस्टिक सपोर्ट करारावर काम करत असून अनेक अब्जावधी डॉलर्सच्या व्यवहारांना अंतिम स्वरुप दिले जात असल्याचे बाबुश्किन यांनी सांगितले आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये भारताने रशियासोबत एस-400 हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणालींच्या 5 यंत्रणा खरेदी करण्यासाठी रशियासोबत 5 अब्ज डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली होती.